साखरखेर्ड्यातील ‘चालता-बोलता न्यायदानाचा दीप’ मालवला; श्री रामगोपाल हिरालाल जैस्वाल यांचे निधन

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-सामाजिक नेतृत्व, न्यायप्रियता आणि धडाडीचे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा आणि पंचक्रोशीतील नावाजलेले, कोणताही वाद असो किंवा तंटा असो तो न्यायाने सोडविण्याची भूमिका जपणारे ‘चालता-बोलता न्यायदानाचा दीपस्तंभ’ म्हणून ओळखले जाणारे श्री रामगोपाल हिरालाल जैस्वाल यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी २४ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून एक प्रभावी, न्यायप्रिय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

साखरखेर्डा येथील राजकीय व सामाजिक पटलावर रामगोपाल जैस्वाल, भाऊसाहेब सावजी, हाजी यासिन सौदागर कुरेशी, पुरुषोत्तम दादा शुक्ल, पांडूजी खरात, विठोबा दसरे ही मंडळी प्रभावी होती. गावातील शेती, धुऱ्याचे किंवा राजकीय वाद असोत, ही मंडळी एकत्र बसून सामंजस्याने सोडवत असत. आज त्या पिढीतील व्यक्ती नसल्या तरी त्यांच्या कार्याची आठवण आजही जिवंत आहे. रामगोपाल जैस्वाल यांनी सामाजिक कार्यात सातत्याने सहभाग घेत न्याय देण्याची भूमिका निभावली. ग्रामपंचायत सदस्य म्हणून तब्बल १५ वर्षे त्यांनी काम केले. सरपंच पदासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यामध्ये त्यांचा निर्णायक प्रभाव असल्याने त्यांना ‘हुकमी एक्का’ म्हणून ओळखले जात होते. गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही त्यांची सक्रिय उपस्थिती असायची. गणेश उत्सव, दुर्गादेवी उत्सव किंवा विजयादशमीच्या सिमोलंघन मिरवणुकीत ते नेहमी अग्रस्थानी असत. सहा फूट उंची, धिप्पाड देहयष्टी, पिळदार मिशा आणि व्यक्तिमत्त्वाला साजेसा पेहराव यामुळे त्यांची वेगळी छाप होती. “दादा आले” असा शब्द उच्चारला की अनेकांना दिलासा मिळायचा.

वयाच्या ९९ व्या वर्षापर्यंत त्यांनी नियमित वृत्तपत्र वाचन केले. त्यांच्या तल्लख बुद्धीमुळे ते येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नावाने हाक मारून विचारपूस करत. ते भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते आणि संघाच्या विविध अधिवेशनांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला होता. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका असोत, त्यांच्या मताला परिसरात मोठे महत्त्व होते. सामाजिक किंवा राजकीय संकटाच्या वेळी ते नेहमी पुढे राहून मार्गदर्शन करत. त्यामुळे त्यांच्या शब्दाला लोक प्रमाण मानत असत. त्यांच्या पश्चात राजू हा मुलगा, तीन मुली, पत्नी तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या तीन मुलांचे—श्रीराम, सुभाष आणि भैय्यालाल—अकाली निधन झाले होते, तरीही त्यांनी कुटुंबाला सावरत पुढील पिढीला व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात पुढे आणले. त्यांच्या निधनाने साखरखेर्डा परिसराने एक न्यायप्रिय, धडाडीचे आणि सर्वमान्य नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची आठवण सदैव स्मरणात राहील.

Share This Article
Exit mobile version