तेली समाजाचा आधारवड स्व. वासुदेव सोनुने यांचे निधन

breakingmah Add a Comment 2 Min Read
2 Min Read

समाजकार्य, कुटुंबप्रेम आणि साधेपणाची जपणूक करणारा आधारवड हरपला

साखरखेर्डा / जालना (अशोक इंगळे) : तेली समाजाचा आधारवड म्हणून जालना व बुलढाणा जिल्ह्यात परिचित असलेले स्व. वासुदेव रामभाऊ सोनुने यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी शुक्रवार, २४ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने तेली समाजासह सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत असून एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

स्व. सोनुने यांचे मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेडराजा होय. व्यवसायासाठी त्यांचे वडील रामभाऊ सोनुने जालना येथे स्थायिक झाले. त्यांनी छोट्या व्यवसायातून सुरुवात करून तेल घाणीच्या व्यवसायात आपला जम बसवला आणि पुढे त्याच व्यवसायाचा वटवृक्ष उभा केला. रामभाऊ सोनुने यांना वासुदेव, नामदेव, जगन्नाथ, सोपान, निवृत्ती आणि जनाबाई अशी सहा अपत्ये होती. त्यापैकी ज्येष्ठ असलेल्या वासुदेव सोनुने यांनी वडीलधाऱ्यांप्रमाणे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी नगरपालिका सेवेत कार्य करत असताना कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे मोठे कार्य केले. नामदेव सोनुने यांनीही व्यवसायात यश मिळवले, तर इतर भावंडांनीही आपल्या क्षेत्रात प्रगती साधली.

कालांतराने कुटुंबावर दुःखाचे सावट आले. १९९५ साली आईचे छत्र हरपले, त्यानंतर वडिलांचेही वृद्धापकाळाने निधन झाले. पुढे नामदेव, निवृत्ती आणि सोपान यांनीही काळाच्या पडद्याआड गेले. अशा परिस्थितीतही स्व. वासुदेव सोनुने व जगन्नाथ सोनुने यांनी कुटुंब एकत्र ठेवत सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. स्व. सोनुने यांचे भगिनी जनाबाई यांच्याशी अतूट नाते होते. त्यांनी कधीही कुटुंबियांना कशाचीही कमतरता भासू दिली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी मायेचा हात कायम ठेवत भावंडांमधील प्रेम जपले. त्यांच्या पश्चात गजानन सोनुने, ज्ञानेश्वर सोनुने ही दोन मुले तसेच मीरा ही एक मुलगी असा मोठा परिवार आहे. दोन्ही पुत्र समाजकार्यात सक्रिय असून वडिलांचा वारसा पुढे नेत आहेत.

आज सकाळी जालना येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच समाजबांधवांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या जाण्याने तेली समाजाने एक मार्गदर्शक, जिव्हाळ्याचा आधारवड गमावला आहे. त्यांची आठवण कायम स्मरणात राहील. २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता जालना येथे रक्षा विसर्जन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मामांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

Share This Article
Exit mobile version