जिजामाता विद्यालय ग्रामीण भागातील आदर्श; विद्यार्थ्यांना घडविण्याचे पवित्र कार्य – सचिव पंजाबराव हाडे

breakingmah Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-“शिक्षकाच्या चुकीवर कारवाई होणार; पालकांच्या गैरसमजाबद्दल संस्थेची दिलगिरी”

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे हक्काचे दालन म्हणून जिजामाता विद्यालयाची स्थापना करण्यात आली असून ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना घडविण्याचे पवित्र कार्य येथे केले जाते, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव पंजाबराव हाडे यांनी केले. एखाद्या शिक्षकाकडून अनावधानाने चूक घडली असल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

साखरखेर्डा येथील श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना सहकार महर्षी कै. भास्करराव शिंगणे तसेच श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. श्री पलसिद्ध महास्वामी मठात आध्यात्मिक शिक्षणासाठी दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची जोड मिळावी म्हणून त्यांना जिजामाता विद्यालयात प्रवेश देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.

या विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन अधिकारी, डॉक्टर व अभियंता म्हणून देशभरात आपली छाप निर्माण केली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची मोफत व्यवस्था संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पुढाकाराने केली जाते. संस्थेच्या प्रगतीत त्यांचे मोलाचे योगदान असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. दरम्यान, नुकत्याच घडलेल्या घटनेबाबत बोलताना हाडे यांनी सांगितले की, संबंधित शिक्षकाकडून झालेली चूक गंभीर असून त्यावर संचालक मंडळ योग्य तो निर्णय घेईल. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व शिक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांमध्ये निर्माण झालेल्या गैरसमजाबद्दल मुख्याध्यापक तसेच राजेंद्र पडघान यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच संस्थेच्या वतीने मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांचीही माफी मागण्यात आली आहे.

Share This Article
Exit mobile version