-पिंडाला कावळ्याचा स्पर्श; उपस्थित जनसमुदाय अवाक
अहिल्यानगर (बाळासाहेब खेडकर) : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावचे सरपंच शरद अरगडे यांनी समाजातील जुनाट रूढी आणि अंधश्रद्धेच्या जोखडातून गावाला मुक्त करण्यासाठी एक अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. २२ एप्रिल २०२६ रोजी त्यांनी जिवंत असतानाच स्वतःचे ‘दहावे’ (दशक्रिया विधी) घालून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या खर्चिक कर्मकांडांऐवजी माणसाच्या जिवंतपणीच्या विचारांना महत्त्व मिळावे, या उद्देशाने त्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला.
या विधीदरम्यान सर्वात आश्चर्यकारक घटना तेव्हा घडली जेव्हा विधीसाठी ठेवलेल्या पिंडाला प्रत्यक्ष कावळ्याने स्पर्श केला. हिंदू परंपरेनुसार मृत व्यक्तीची इच्छा पूर्ण झाल्यावरच कावळा पिंडाला शिवतो अशी श्रद्धा आहे, मात्र एका जिवंत व्यक्तीने हा विधी केला असतानाही कावळ्याने अन्नाला स्पर्श केल्याने उपस्थित सर्व गावकरी अवाक झाले. “श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसट रेषा ओळखा” असा जणू निसर्गानेच दिलेला हा संदेश असल्याची चर्चा आता परिसरात रंगली आहे.
शरद अरगडे यांच्या मते, सामान्य माणूस मृत्यूनंतरच्या खर्चिक विधींच्या ओझ्याखाली दबला जातो, त्यापेक्षा जिवंतपणी एकमेकांना मदत करणे आणि समाजसुधारणा करणे अधिक महत्त्वाचे आहे. सौंदाळा गाव हे आधीच ‘जातीमुक्त गाव’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, सरपंचांच्या या कृतीने गावाची पुरोगामी ओळख आता अधिक गडद झाली आहे. कर्मकांडांच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतःवरच हा प्रयोग करून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.

