अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगांची परंपरा कायम

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-शेकडो वर्षांची परंपरा जपली; रात्रभर जागरणात ग्रामस्थांचा उत्साह

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे दिनांक १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू असलेली सोंगांची परंपरा आजही कायम असून, यंदाही गावकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे रात्रभर सोंगाचे आयोजन केले होते. या पारंपरिक सोहळ्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

१९ एप्रिल रोजी रात्रभर गावातील बसस्थानकाजवळील मैदानावर सालाबादप्रमाणे सोंग पाहण्यासाठी संपूर्ण गावातून महिला, पुरुष तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित राहून जागरण करत सोंगाचा आनंद घेत होते. सोंगामध्ये झाडझुडीचे नागेश काटकर, लिंबड्याचे कृष्णा गिरी, रामाचे विलास बेलोडे, लक्ष्मणाचे ज्ञानेश्वर खरात, भस्मासुराचे विलास गावडे, रावणाचे काशिनाथ बुरकुल, अगंद मारोती कैलास काळे, बंडू बंगाळे, महादेव-पार्वतीचे विनोद उर्फ पप्पू खरात व श्रीकांत बंगाळे, सीतेचे पप्पू खरात, हिरण्यकश्यपाचे सौरभ निकस, प्रल्हादाचे बाल ऋषिकेश गुणेवाड, डाकिनचे शिवाजी खरात, श्रावण बाळाचे उमेश बंगाळे यांनी सोंग साकारले.

तसेच वाघ्या-मुरळीचे आयोजन शिवाजी खरात, आश्रुबा गवई, यशवंता खंडारे व पंजाब मोरे यांनी केले होते. सकाळी आईचे सोंग मनोहर खरात यांनी साकारले असून ते संपूर्ण गावातून मिरवण्यात आले. यावेळी गावातील महिलांनी आईच्या सोंगाची पूजा-अर्चा केली. शेवटी आईच्या सोंगाची व भोपे नितीन येरमुले, पप्पू खरात, बाबू मारके यांच्यात जवळपास दोन तास रंगीत तालीम झाली.

Share This Article
Exit mobile version