-ग्रामसभेत ठरावाविरोधात अधिक मते; सरपंचांना ३९ मतांची आघाडी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. नलिनी गरड यांच्यावर ३० मार्च रोजी उपसरपंचासह ९ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता. तो पारितही झाला होता. परंतु आज ग्रामसभेत हा अविश्वास ठराव मांडला असता ग्रामसभेने तो फेटाळला.
सरपंच निर्णय घेताना सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, तसेच जनहिताच्या विरोधात निर्णय घेत असल्याने गावाच्या विकासकामांना अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. याशिवाय प्रशासनातील अभाव, विकासकामांतील अनियमितता, सदस्यांना असहकार्य आणि ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असेही आरोप करण्यात आले होते. ३० मार्च रोजी विद्या संजय लहाने, प्रकाश रामभाऊ गरड, नंदा श्रीकृष्ण तळेकर, दत्तू त्र्यंबक तळेकर, अलका सुधाकर नागरे, जनार्दन विक्रम नागरे, मिनाक्षी विनोद म्हस्के, सुनिता सुरेश भालेकर आणि स्वाती शिवानंद खेडेकर या ९ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता.
सौ. नलिनी गरड या जनतेतून निवडून आलेल्या सरपंच असल्याने तहसीलदार अजित दिवटे यांनी १६ एप्रिल रोजी ग्रामसभा घेऊन ठराव मांडला. अविश्वास ठरावाच्या बाजूने १५१ मते तर विरोधात १९० मते पडली. त्यामुळे ठराव फेटाळण्यात आला आणि सरपंचांना ३९ मतांची आघाडी मिळाली. सरपंचपदी सौ. नलिनी राजेंद्र गरड कायम राहिल्याने उपस्थितांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.

