मेहकर हादरले! हॉटेलच्या काउंटरखाली तीन वर्षांपासून गाडलेले ‘ते’ रहस्य अखेर बाहेर!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read
  • जामगाव शिवारातील बंद ढाब्यातून मानवी सांगाडा पोलिसांनी उकरला!

  • एसडीपीओ संतोष खाडे यांची ‘दृश्यम’ स्टाईल कारवाई!

मेहकर (तालुका प्रतिनिधी): तालुक्यातील जामगाव शिवारात एका बंद ढाब्याच्या काउंटरखाली तब्बल तीन वर्षांपूर्वी पुरलेला मानवी सांगाडा पोलिसांनी मंगळवारी उकरून काढला. २०२० मध्ये एका व्यक्तीचा घातपात करून त्याचा मृतदेह हॉटेलमध्येच गाडल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून, या ‘दृश्यम’ स्टाईल हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मेहकर येथील मोळा रोडवर बाबाभाई कुरेशी यांचे शेत आहे. हे शेत त्यांनी एका ढाब्यासाठी भाड्याने दिले होते. या ढाब्याच्या परिसरात एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह हॉटेलच्या काउंटरखाली पुरण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी सकाळी १० वाजता घटनास्थळी धाव घेतली.

संशयास्पद जागेवर पोलिसांनी उत्खनन सुरू केले असता, तिथे गाडलेला मृतदेह (सांगाडा) आढळून आला. साधारण तीन वर्षांपूर्वी ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे ही मोहीम राबवली असली, तरी जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेल्या या कारवाईमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. बाहेर काढलेले शव नेमके कोणाचे आहे? ती व्यक्ती पुरुष होती की महिला? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

या व्यक्तीचा घातपात का करण्यात आला? तो कोणी केला? आणि गेल्या तीन वर्षांपासून हे रहस्य दडपून ठेवण्यात कोण कोण सामील होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेने मेहकर परिसरात दहशतीचे वातावरण असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ढाबा चालक आणि संबंधित संशयितांची चौकशी आता तीव्र करण्यात आली आहे.

Share This Article
Exit mobile version