मस्तकात विचारांची ‘पेरणी’ अन् संविधानाचा काळजातून ‘जागर’

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-अंधश्रद्धेवर विवेकाचा प्रहार; प्रबोधन सोहळ्यात परिवर्तनाचा संदेश

देऊळगाव माळी (प्रतिनिधी) : “महामानवांनी ज्या मूल्यांसाठी आयुष्य वेचले, ती मूल्ये केवळ इतिहासाच्या पानांवर न राहता ती आपल्या सुपीक मस्तकात पेरली गेली पाहिजेत. जोपर्यंत कष्टकरी आणि वंचितांची मुले शिक्षणाचे शस्त्र हाती घेऊन सत्तेच्या आणि ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने क्रांती घडणार नाही,” असा सूर देऊळगाव माळी येथील प्रबोधन सोहळ्यात उमटला. ‘सेवानिवृत्त सेवा संघा’च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी तरुणांना मार्गदर्शन करत संविधानाची महती विषद केली. “आज मी जो तुमच्यासमोर अधिकारी म्हणून उभा आहे, ते केवळ डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे. संविधानातील कलम १४ ते ३५ मधील मूलभूत हक्कांमुळेच गावखेड्यातील सामान्य मुले मोठी स्वप्ने पाहू शकतात. तरुणांनी केवळ मिरवणुकांमध्ये न रमता शिक्षणाचे शस्त्र हाती घेऊन स्वतःचे भविष्य उज्ज्वल करावे,” असे त्यांनी सांगितले. मुख्य व्याख्याते प्रा. डॉ. शाम मुडे यांनी संत साहित्य आणि संविधान यांची सांगड घालत अंधश्रद्धा व व्यसनांपासून दूर राहून विवेकवादी समाज घडवण्याचे आवाहन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना सेवानिवृत्त सेवा संघाचे संकल्पक दि. स. अंभोरे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी संघ कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमात ‘संविधान जागर’ सादर करण्यात आला.

प्रास्ताविक शिवाजी जमधाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रा. अनिल कलोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील नागरिक, माता-भगिनी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Share This Article
Exit mobile version