-चार भाषांतील कीर्तनसेवा; अभ्यासक-उपासकांचा परिसंवाद स्तुत्य उपक्रम
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठानच्या वतीने १२ ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत बहुभाषिक कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सांगता १९ एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. सुभाष महाराज गेठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवात मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली असून भाविक, उपासक आणि अभ्यासकांचा उत्साही प्रतिसाद मिळत आहे.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. गेठे यांनी महोत्सवाची सविस्तर माहिती दिली. या वेळी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, प्रा. श्रीधर घुंडरे पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षांपासून संत विचारांचा प्रचार-प्रसार करत असून विविध भाषांमध्ये संत साहित्याचे अनुवाद, विद्यार्थ्यांसाठी संस्कारवर्ग, व्याख्याने आणि आध्यात्मिक उपक्रम राबवित आहे. याच पार्श्वभूमीवर संत विचार जागतिक स्तरावर पोहोचावेत या उद्देशाने बहुभाषिक कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवात दररोज पहाटे काकडा, विष्णुसहस्रनाम, गाथा निरूपण, दुपारी बहुभाषिक कीर्तन, परिसंवाद, हरिपाठ आणि संध्याकाळी कीर्तनसेवा असे विविध कार्यक्रम होत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान व संस्कृत विभागातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांचा अभ्यासक-उपासक परिसंवादही आयोजित करण्यात आला आहे. विविध जिल्ह्यांतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून १५ एप्रिल रोजी संगीत भजन, १६ एप्रिल रोजी अनुभव कथन, १७ एप्रिल रोजी अभिव्यक्ती परिसंवाद आणि १८ एप्रिल रोजी अभ्यासक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात अनेक मान्यवर कीर्तनकार विविध भाषांमध्ये कीर्तनसेवा देत आहेत. संत विचारांचा प्रसार करून समाजात शांती, समरसता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश पोहोचवण्याचा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असून, अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. १९ एप्रिल रोजी डॉ. सुभाष महाराज गेठे यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार असून त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

