-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी भरीव निधी देणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही
बुलढाणा(जिल्हा प्रतिनिधी) : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई साहेब यांच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला ३७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करवंड येथे प्रथमच ‘ऐतिहासिक करवंड महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या माध्यमातून इतिहासाला उजाळा मिळण्यासोबतच किल्ले व बुरुजांचे संवर्धन आणि भव्य स्मारक उभारणीसाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व करवंड महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली तालुक्यातील करवंड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषद आमदार धिरज लिंगाडे, विधानसभा आमदार श्वेता महाले, संजय गायकवाड, सिद्धार्थ खरात, मनोज यदे, मुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक विद्याधर महाले, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, अनिकेत निंबाळकर, आयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१५ एप्रिल १६५७ रोजी झालेल्या या ऐतिहासिक विवाहाच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, हा विवाह सोहळा केवळ कौटुंबिक प्रसंग नसून स्वराज्याच्या उभारणीतील एक महत्त्वाचा दुवा आहे. करवंड येथील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी विशेष प्रकल्प मंजूर करण्यात येईल. यामध्ये महाराणी गुणवंताबाई यांचा भव्य पुतळा उभारणे, राजवाड्याची डागडुजी करणे तसेच पर्यटनाच्या दृष्टीने परिसराचा विकास करणे या कामांना प्राधान्य दिले जाईल. तसेच या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थ व शिवप्रेमींचा सहभाग आवश्यक असून तांत्रिक अडचणी व प्रशासकीय परवानग्यांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार श्वेता महाले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, करवंड महोत्सवाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी तात्काळ पुढाकार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे हा सोहळा भव्य स्वरूपात पार पडला. तसेच चिखली ते बुलढाणा दरम्यान वाढलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले असून, ती सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.