-मोहाडी गावात हळहळ; उपचारादरम्यान मृत्यू
साखरखेर्डा (वार्ताहर) : मोहाडी येथील ऑटो चालक शरद सुखदेव इंगळे (वय ३५ वर्षे) यांनी १४ एप्रिल रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
शरद हे साखरखेर्डा ते मोहाडी रोडवर प्रवासी ऑटो रिक्षा चालवून आपला घरप्रपंच चालवत होते. १४ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता त्यांनी मोहाडी येथे विषारी औषध प्राशन केले. ही माहिती त्यांचे भाऊ व होमगार्ड राहुल इंगळे यांना मिळताच गावातील नागरिकांच्या मदतीने त्यांना चिखली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
शरद इंगळे यांच्या निधनाने मोहाडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या पार्थिवावर १५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

