झाले गुलाम मोकळे, भिमा तुझ्या जन्मामुळे…

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-रखरखत्या उन्हातही उत्साह शिगेला; जिल्हाभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

बुलढाणा (बाळू वानखेडे) : जिल्ह्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. रखरखत्या उन्हामुळे उकाडा जाणवत असतानाही आंबेडकरी अनुयायांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता. ठिकठिकाणी मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मेहकर शहरात आमदार सिद्धार्थ खरात यांनी तब्बल एक कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करून महामानवाला आगळीवेगळी मानवंदना दिली.

बुलढाणा शहरात जयंती उत्सव मंडळाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड, रविकांत तुपकर, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राजर्षी शाहू परिवाराचे संदीप शेळके यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यानिमित्त आनंद शिंदे यांच्यासह विविध गायकांचे कार्यक्रमही पार पडले. जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांत महामानवाला अभिवादन करण्यात आले. खामगाव, चिखली, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, नांदुरा, मोताळा तसेच ग्रामीण भागातही भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे यांनी विविध गावांतील मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला.

 मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथेही भीम जयंती ची मिरवणूक जल्लोषात निघाली. येथील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी सह विविध शासकीय कार्यालयात देखील महामानवाला अभिवादन करण्यात आले. मिरवणूक दरम्यान महिलांच्या लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले होते. लक्ष्मी अर्बन पतसंस्थेच्या वतीने भारतीय संविधान प्रतीचे वाटप करण्यात आले. मिरवणूक दरम्यान अनुयायांसाठी अँड . शैलेश गायकवाड यांच्याकडून नाश्ता तसेच प्रशासक संदीप आल्हाट यांचेकडून थंडगार सरबत व चवदार उसळची व्यवस्था करण्यात आली होती. सदर मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे लोक स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले. याशिवाय ठीकठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील सोय गावकऱ्यांकडून करण्यात आल्याचे दिसून आले.जानेफळचे ठाणेदार आजिनाथ मोरे यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.

Share This Article
Exit mobile version