पिंप्री खंदारे येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त भव्य व्याख्यानमाला

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-समता, बंधुता व सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर; मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार

पिंप्री खंदारे (ऋषी दंदाले): महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी पिंप्री खंदारे येथे भव्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक जागृतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सम्राट अशोक मित्र मंडळ, पिंप्री खंदारे तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमाचे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह असे निश्चित करण्यात आले आहे. रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमासाठी मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

व्याख्यानमालेत प्रा. कमलेश खिल्लारे “बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा आणि आम्ही” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल चव्हाण “फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा आणि आधुनिक बहुजन समाज : आव्हाने, वास्तव आणि दिशा” या विषयावर सखोल विवेचन करणार आहेत. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा प्रसार करून समाजात जागृती निर्माण करणे आणि युवकांना सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरित करणे हा मुख्य उद्देश आहे. तरी पिंप्री खंदारे व परिसरातील नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी तसेच समाजप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version