बुलढाणा (बाळू वानखेडे) : गेल्या सात वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर शासनाने ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ मधील तांत्रिक अडचणीत अडकलेल्या पात्र शेतकऱ्यांचा मार्ग यामुळे मोकळा झाला असून, जिल्ह्यातील सुमारे १०,२३३ शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा आता कमी होणार आहे. दरम्यान, निधी मंजूर होताच जिल्ह्याच्या राजकारणात श्रेयवादाची लढाई सुरू होण्याची चिन्हे आहेत.
बुलढणा जिल्ह्याचे लाभ-गणित
| योजनेचा प्रकार | लाभार्थी शेतकरी | मंजूर निधी (कोटीत) |
| थेट कर्जमाफी लाभ | १०,२३३ | ४९.२३ |
| OTS (एकमुस्त परतफेड) | ४,४७८ | २८.७४ |
| १.५ लाखांपर्यंतची मर्यादा | ४,७४९ | २०.४८ |
बुलढाणा जिल्हा सहकारी बँक गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. या ५०० कोटींच्या निधीमुळे केवळ शेतकऱ्यांनाच दिलासा मिळणार नाही, तर बँकेच्या वसुलीला आणि तरलतेलाही (Liquidity) मोठा आधार मिळणार आहे. प्रलंबित प्रकरणांची फाईल मार्गी लागल्याने जिल्ह्याच्या कृषी अर्थकारणात पुन्हा चैतन्य येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “ग्रीन लिस्ट” मधील वंचित शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असून ही प्रक्रिया सहकारी बँकांमार्फत युद्धपातळीवर राबवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
राजकीय श्रेयवादाची जुंपणार
निधीची घोषणा होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेय घेण्याची चढाओढ सुरू होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा ‘निधी वर्षाव’ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी पडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

