समृद्धी महामार्गावर बॅटरी वाहून नेणाऱ्या ट्रकचा थरार; चालक थोडक्यात बचावला, वाहनासह बॅटरी जळून खाक!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

तीन अग्निशमन बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण; दुसरबीड जवळची घटना

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी धावत्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. इन्व्हर्टरच्या बॅटरी घेऊन जाणाऱ्या या ट्रकने अचानक पेट घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र, ट्रकमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने तत्परता दाखवत वाहन रस्त्याच्या कडेला उभे केल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत ट्रकसह आतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित कुमार (रा. गाजीपूर) हा चालक बनारस येथून इन्व्हर्टरच्या बॅटरी घेऊन नाशिकच्या दिशेने (यूपी ६५ आर डी २१४०) जात होता. रविवारी सकाळी आठच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील दुसरबीड जवळ (चॅनेल क्र. ३१२) ट्रकमधून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न करता त्याने ट्रक महामार्गाच्या कडेला सुरक्षित स्थानी उभा केला. त्यानंतर काही वेळातच बॅटरींनी पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले.


अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांकडून पाण्याचा मारा

घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस सहाय्यक निरीक्षक इंगळे, शेख नासिर, नाजीम चौधरी, श्रीकृष्ण दुंगू, गायकवाड, इंदल राजपूत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी समृद्धी महामार्गावरील दोन लहान अग्निशमन वाहने आणि मेहकर नगरपालिकेच्या एका पथकाला पाचारण करण्यात आले होते. तीन गाड्यांच्या साहाय्याने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत ट्रक आणि त्यातील बॅटरींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

आर्थिक नुकसान, पण बचावले प्राण

या भीषण आगीत ट्रक आणि त्यातील साहित्याचा कोळसा झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, चालक रोहित कुमार यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article
Exit mobile version