– रस्ते आणि पुलांच्या कामांनाही मंजुरी; आमदार मनोज कायंदे यांच्या पाठपुराव्याला यश!
सिंदखेडराजा/साखरखेर्डा/दे. राजा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, देऊळगाव राजा शहरासाठीची ३४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यासोबतच मतदारसंघातील विविध रस्ते आणि पुलांच्या कामांना २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली असून, यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
दृष्टिक्षेपात: मंजूर रस्ते व पुलांची कामे
आमदार मनोज कायंदे यांच्या पाठपुराव्यातून २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मतदारसंघातील खालील कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे:
- प्रमुख मार्ग सुधारणा: अमडापूर-लव्हाळा-दुसरबीड रस्ता, अंधेरा-मलकापूर पांग्रा बिबी-किनगाव जटू-भुमराळा मार्ग.
- मजबुतीकरण व रुंदीकरण: बायगाव ते देऊळगाव मही रस्ता, इसरूळ ते डौंग्रा पिंप्री-आंधळे-अंधेरा फाटा-मेरा बु.-साखरखेर्डा-देऊळगाव माळी मार्ग.
- ग्रामीण जोडणी: अंजली परिसराला जोडणारा शिवणी टाका-पांगार खेड-महारखेड-सोनोषी-वरदडी मार्ग; तसेच देऊळगाव राजा-सातेफळ-राजूर गणपती मार्ग.
- पूल बांधकाम: साखरखेर्डा-पिंपळगाव सोनारा-मेरा बु. या मार्गावरील लहान पुलांच्या कामांना विशेष मान्यता.
- अंतर्गत विकास: जांभोरा व सोनोषी गावांमधील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरण व मजबुतीकरणावर भर.
—-
“मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत गरजा सोडवण्याला आमचे प्राधान्य आहे. रखडलेली पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे विस्तारल्याने विकासाला नवी दिशा मिळेल.”
— मनोज कायंदे, आमदार, सिंदखेडराजा

