१७ वर्षांच्या देशसेवेनंतर जवानाचे जल्लोषात स्वागत; चिखली ते शेलगाव निघाली दुचाकी रॅली
चिखली (तालुका प्रतिनिधी) भारतीय सैन्य दलातील ‘बॉम्बे इंजिनिअर ग्रुप’मध्ये १७ वर्षांची प्रदीर्घ आणि यशस्वी सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले जवान हवालदार संदीप राधाकिसन ठेंग यांचे गुरुवारी त्यांच्या जन्मभूमीत, शेलगाव जहांगीर येथे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित ‘सेवापूर्ती सन्मान सोहळा व भव्य मिरवणूक’ कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी आणि देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता.
यावेळी बोलताना कर्नल (नि.) सुहास जतकर म्हणाले की, “आपले तारुण्य देशसेवेसाठी अर्पण करणाऱ्या सैनिकांमुळेच आज गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. सैनिकी जीवनातील शिस्त, त्याग आणि समर्पणाचा वारसा नव्या पिढीने आदर्श म्हणून जोपासावा.” सत्काराला उत्तर देताना हवालदार संदिप ठेंग यांनी आपल्या सैन्य दलातील अनुभवांना उजाळा देत ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्याला माजी सैनिक शिवराम निकम, सवडे, ज्ञानेश्वर ठेंग, रामेश्वर सोळंकी, श्रीकृष्ण बंगाळे, डॉ. विलास बोर्डे, भिमराव भिसे, सरपंच अरुण सरनाईक यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली.

