प्रा. उद्धवराव घुबे यांचा वाढदिवस ‘भगवद्गीता’ वाटपाने साजरा!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– पुढील वर्षापर्यंत ग्रंथ लिहून पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना २१०० रुपयांचे बक्षीस!

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमांनी ठसा उमटवणारे जानकीदेवी विद्यालयाचे सचिव तथा विठ्ठल पार्वती अर्बनचे अध्यक्ष प्रा. उद्धवराव घुबे यांचा वाढदिवस यावर्षी ‘अध्यात्म आणि संस्कार’ या संकल्पनेतून साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचे वाटप करण्यात आले असून, वर्षभरात हा ग्रंथ लिहून पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना २१०० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

प्रा. घुबे यांनी वाढदिवसानिमित्त अमोना, इसरुळ आणि देऊळगाव घुबे येथील शाळांमधील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना ५१ भगवद्गीता प्रतिंचे वाटप केले. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमी होत चाललेली लिखाणाची आवड पुन्हा निर्माण व्हावी आणि त्यांना आध्यात्मिक बाळकडू मिळावे, या उद्देशाने ही अनोखी लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. ११ एप्रिल २०२७ पर्यंत जो विद्यार्थी हा ग्रंथ वहीत लिहून पूर्ण करेल, त्यातून प्रत्येक शाळेतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यास २१०० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.

यावेळी अमोना येथे शाळा समिती अध्यक्ष गजानन पाटील इंगळे, मधुकर मामा वाघ, अंबादास महाराज, डॉ. शिवदास भांदर्गे उपस्थित होते. इसरूळ येथे सरपंच सतीश पाटील भुतेकर, भिकनराव भुतेकर तर देऊळगाव घुबे येथे गजानन घुबे, योगेश सरोदे, विष्णू बंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जानकीदेवी विद्यालयात प्राचार्य एच. जी. घुबे, केंद्रप्रमुख बळकर व शिक्षक वृंद उपस्थित होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, युवा नेते हनुमान मिसाळ यांनीही उपक्रमाचे कौतुक करत सदिच्छा दिल्या.

भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शेणफडराव घुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा समाजभिमुख उपक्रम कौतुकास्पद आहे. आजच्या युगात विद्यार्थ्यांना अशा संस्कारांची नितांत गरज आहे. – सतीश भुतेकर, सरपंच, इसरूळ

Share This Article
Exit mobile version