बिबी येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर; ३०० हून अधिक रुग्णांची तपासणी

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

भिमाई महिला बहुउद्देशीय संस्थेने जपला सामाजिक बांधिलकीचा वारसा!

बिबी (ऋषी दंदाले) : ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा अभाव दूर करण्यासाठी बिबी येथील भिमाई महिला बहुउद्देशीय संस्था आणि छत्रपती संभाजीनगर येथील लॉयन्स क्लब (चिकलठाणा) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच भव्य नेत्ररोग तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात बिबीसह परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांनी आपली नेत्रतपासणी करून घेतली.

शिबिराचे उद्घाटन बिबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील आणि अद्विका महाविद्यालयाच्या संचालिका पुष्पाताई बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. या शिबिरात लॉयन्स क्लबच्या वैद्यकीय चमूने रुग्णांची बारकाईने तपासणी केली. डॉ. सुमित गवळी, डॉ. मंथन बदर, शुभम दाभाडे, नितेश देवरे आणि अविनाश सोनुने यांनी रुग्णसेवा दिली. तपासणीअंती अनेक रुग्णांना सवलतीच्या दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ज्या रुग्णांना मोतीबिंदू किंवा अन्य शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा रुग्णांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या शस्त्रक्रियेची व्यवस्था लॉयन्स क्लबमार्फत करण्यात येणार आहे.

भिमाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. ‘ग्रामीण भागातील गरजू रुग्णांपर्यंत अत्याधुनिक आरोग्य सुविधा पोहोचाव्यात, हाच या शिबिरामागचा मुख्य उद्देश असून, आगामी काळातही असे उपक्रम सुरू राहतील,’ असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी केंद्रप्रमुख बोरकर, मुख्याध्यापक डहाळके, सीताराम इंगळे, सूर्यभान हिवाळे, अण्णाभाऊ इंगळे यांच्यासह संस्थेच्या अध्यक्षा वनिताबाई इंगळे, उपाध्यक्ष रेश्माबाई हिवाळे, सचिव नंदाबाई इंगळे आणि सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पत्रकार ब्रम्हानंद वाकोडे यांनी केले.


ठळक वैशिष्ट्ये:

  • आयोजक: भिमाई महिला बहुउद्देशीय संस्था व लॉयन्स क्लब, छत्रपती संभाजीनगर.
  • लाभार्थी: ३०० हून अधिक ग्रामस्थ.
  • विशेष: गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रियेची मोफत/सवलतीच्या दरात व्यवस्था.
Share This Article
Exit mobile version