जानकीदेवी विद्यालयाचे सचिव प्रा. उद्धवराव घुबे यांचा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-भगवद्गीता वाटप व विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम; समाजोपयोगी कार्याची परंपरा कायम

देऊळगाव घुबे, ता. चिखली (राजेंद्र घुबे) : येथील सुप्रसिद्ध जानकीदेवी विद्यालयाचे सचिव तथा मेरा खुर्द येथील विठ्ठल पार्वती अर्बनचे अध्यक्ष प्रा. उद्धवराव घुबे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रा. उद्धवराव घुबे हे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत विविध उपक्रम राबविण्यासाठी नेहमी तत्पर असतात. राष्ट्रमाता जिजाऊ महोत्सव, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता अभियान तसेच विद्यार्थ्यांकडून पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे कार्य ते सातत्याने करत आले आहेत.

विठ्ठल पार्वती अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांना आर्थिक मदत, ५१ माजी सैनिकांचा सत्कार, महिला बचत गटांना सहाय्य तसेच क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यापूर्वी रक्तदान शिबिराचे आयोजनही त्यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर ११ एप्रिल रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमद् भगवद्गीतेच्या सुमारे ५१ प्रती देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी विद्यालय, अमोना व इसरूळ येथील जिल्हा परिषद शाळांमधील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी पुढील वर्षी ११ एप्रिलपर्यंत हा ग्रंथ वहीमध्ये लिहावा आणि उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१०० रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली.

या उपक्रमामागील हेतू म्हणजे विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे महत्त्व समजावे व त्यांच्यात आध्यात्मिक संस्कार रुजावेत हा आहे. मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे वळविण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. अमोना, इसरूळ व देऊळगाव घुबे येथे विविध मान्यवर, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजामध्ये अशा प्रकारच्या उपक्रमाची गरज असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी लाभदायक असल्याचे मत सतीश भुतेकर, गजानन इंगळे, मधुकर मामा वाघ व योगेश सरोदे यांनी व्यक्त केले. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेणफडरावजी घुबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. उद्धवराव घुबे समाजोपयोगी कार्य करत असून त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Share This Article
Exit mobile version