सुळबाच्या ओढ्यात तरुणाचा खून; शेवगाव हादरले

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-दिवसाढवळ्या हल्ला; दोघे पोलिस ताब्यात

बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव शहरातील ढाकणे वस्ती परिसरातील सुळबाच्या ओढ्यात शनिवारी दुपारी एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून शहरात खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव गणेश दिनकर लांडे (वय ३२, रा. सालवडगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास शहराच्या पूर्व भागातील सुळबाच्या ओढ्याजवळ काही जणांमध्ये हाणामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर शहानिशा करण्यासाठी एक होमगार्ड घटनास्थळी गेले असता तेथे उपस्थित असलेले सर्वजण पळून गेले. होमगार्डने तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळला आणि त्याला जागीच मृत घोषित करण्यात आले.

प्राथमिक तपासात गणेश दिनकर लांडे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागल्याने अतिरक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या खुनामुळे शेवगाव शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसा खून; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share This Article
Exit mobile version