साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज; दोन्ही वैद्यकीय अधिकारी वैष्णवी रुजू

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा बळकटीकरण; ग्रामस्थांकडून नव्या डॉक्टरांचे स्वागत

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : ग्रामीण भागातील रुग्णांची वैद्यकीय वाहिनी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाहिले जाते. त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. आज साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. वैष्णवी राठोड आणि डॉ. वैष्णवी मेरत रुजू झाल्या आहेत. त्यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यापूर्वी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. गोपाल परिहार हे काम पाहत होते. त्यांची बदली झाल्याने येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. वैष्णवी दिनकरराव राठोड आणि डॉ. वैष्णवी चंद्रकांत मेरत या रुजू झाल्या आहेत. दोन्ही वैद्यकीय अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी यश प्राप्त केले आहे. ग्रामीण भागातील असून गावापासून कोसो दूर जाऊन त्यांनी शिक्षण घेतले आहे.

बाळसमुद्र या गावात सातवीपर्यंत शाळा असून त्यानंतर साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयात दहावीपर्यंत वैष्णवी मेरत यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी बाहेर शहरात जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील चंद्रकांत मेरत हे शेतकरी असून त्यांनी सरपंच म्हणून पाच वर्षे गावाचा कारभार चोख सांभाळला, तसेच मुलीच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही. आज त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या आहेत. तर वैष्णवी राठोड यांचे वडील सुलतानपूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दोघींनीही प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. आज १० एप्रिल रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे, भाजप नेते किसनराव आटोळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नितीन मेरत, चंद्रकांत मेरत, दिलीप खंडारे, डी. एन. पांचाळ, संतोष मोरे, गोपाल शिराळे, अशोक काळे, सुनील रिंढे, भागवत काळे, अशोक इंगळे (पत्रकार) व गोपाल मानतकर उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version