डॉ. आंबेडकर जयंती उत्साही शांततेत साजरी करावी : वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-आळंदी पोलीस स्टेशनच्या शांतता कमेटी बैठकीत मार्गदर्शन; मिरवणुका वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन

आळंदी (अर्जुन मेदनकर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आळंदी पंचक्रोशीत पारंपरिक पद्धतीने, उत्साही आणि शांततेत साजरी करावी, असे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी केले. जयंती निमित्त होणाऱ्या मिरवणुका व कार्यक्रमांसाठी पोलीस बंदोबस्त आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, मात्र मिरवणुका वेळेत सुरू करून मर्यादित वेळेत पूर्ण कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

आळंदी पोलीस स्टेशनच्या सभागृहात शांतता कमेटीची बैठक पार पडली. या बैठकीस नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, शांतता कमेटीचे पदाधिकारी, विविध जयंती उत्सव मंडळांचे संयोजक, तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना नरके यांनी सर्वांना सामाजिक सलोखा राखून जयंती साजरी करण्याचे आवाहन केले. बैठकीत विविध मंडळांच्या कार्यक्रमांचे नियोजन, मिरवणुकांचे स्वरूप, सामाजिक उपक्रमांची माहिती घेण्यात आली. रक्तदान शिबिरे, संविधान जागर अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम अशा उपक्रमांद्वारे जयंती साजरी करण्याचे नियोजन असल्याचे समोर आले. नरके यांनी सर्वांनी सतर्क राहून कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगितले.

मिरवणुकीबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, १४ एप्रिल रोजी मिरवणुका काढल्यास रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी राहील, तर इतर दिवशी मिरवणुकांसाठी रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी असेल. त्यामुळे शक्यतो सर्वांनी १४ एप्रिललाच मिरवणुका आयोजित कराव्यात, असे आवाहन करण्यात आले. तसेच ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवाजाची मर्यादा पाळावी आणि फटाक्यांच्या वापरात संयम ठेवावा, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन करताना, आंबेडकरांच्या समता, बंधुता, शिक्षण आणि संघर्ष या मूल्यांचा समाजाने स्वीकार करावा, असे सांगितले. बाबासाहेबांचे विचार प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बैठकीदरम्यान श्री रामनवमी निमित्त आळंदी येथे झालेल्या पालखी मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल आवेकर भावे रामचंद्र संस्थानच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके आणि पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन निसार सय्यद यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
Exit mobile version