विकसित भारतासाठी तरुणांचे योगदान अनिवार्य – आ. श्वेता महाले पाटील

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-राष्ट्रकुल संसदीय परिषदेत प्रभावी मांडणी; ‘ब्रेन ड्रेन’ थांबवण्यावर भर

पणजी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत @२०४७’ या स्वप्नपूर्तीसाठी तरुणांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून देशाच्या प्रगतीचा पाया तरुण शक्तीमध्येच आहे, असे प्रतिपादन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) भारत शाखेच्या झोन-७ तर्फे पणजी येथे आयोजित प्रादेशिक परिषदेत त्या बोलत होत्या. या परिषदेला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून १० एप्रिलपर्यंत परिषद सुरू आहे. ‘आधुनिक भारताच्या विकासात तरुण नेत्यांची भूमिका’ या विषयावर बोलताना आमदार महाले पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भ देत सांगितले की, केवळ १०० सक्षम तरुण भारताचे भविष्य बदलू शकतात, ही त्यांची दूरदृष्टी आजही तितकीच लागू आहे. पंतप्रधान मोदींचे ‘विकसित भारत’ स्वप्न हे विवेकानंदांच्या ‘जागृत भारत’ संकल्पनेची आधुनिक आवृत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताची सुमारे ६५ ते ७४ टक्के लोकसंख्या ४० वर्षांखालील असून हीच देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘अटल इनोव्हेशन मिशन’ यांसारख्या योजनांद्वारे तरुणांना सक्षम करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ‘ब्रेन ड्रेन’ या गंभीर विषयावरही भाष्य केले. आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएससारख्या नामांकित संस्थांमधून शिक्षण घेतलेले अनेक तरुण परदेशात स्थायिक होत असून त्यांच्या प्रतिभेचा फायदा भारताला होत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय विद्यापीठांना जागतिक दर्जा प्राप्त करून देणे आणि प्रवासी भारतीयांना देशाच्या विकासात सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

राज्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार ‘विकसित महाराष्ट्र’ घडविण्यासाठी कार्यरत असून विविध योजनांद्वारे तरुण, महिला व शेतकरी वर्ग सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांमध्ये उच्च शिक्षण, नैतिकता, पारदर्शकता आणि देशभक्तीची भावना विकसित झाली तर तेच भविष्यात देशाचे खरे शिल्पकार ठरतील, असे मत व्यक्त करत राष्ट्रकुल परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळणे अभिमानास्पद असल्याची भावना आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केली.

Share This Article
Exit mobile version