सत्यशोधक चळवळीतून सामाजिक क्रांती – प्रतापराव जाधव

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा आजही समाजाला मार्गदर्शक ठेवा

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी करून मोठी सामाजिक क्रांती घडवली, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

साखरखेर्डा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ७ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, त्या काळात महात्मा फुले यांनी समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा आणि अनाठायी खर्च याविरोधात प्रबोधन केले. आजही हेच कार्य सत्यपाल महाराज आपल्या कीर्तनातून आणि प्रवचनातून करत आहेत.

जाधव यांनी पुढे सांगितले की, शेतकरी व कष्टकरी वर्गाने अनाठायी खर्च, दिखावा आणि स्पर्धा टाळून साधेपणाने जीवन जगावे, हा संदेश फुले यांनी दिला होता. ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथातून त्यांनी ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, चिखली परिसरातील माजी खासदार पंढरीनाथ पाटील व मेहकरचे आयाजी पाटील यांनी सत्यशोधक चळवळीचा प्रचार-प्रसार करून समाजजागृतीचे कार्य केले. त्या काळात तेराव्याचे कार्यक्रम कमी करणे, साध्या पद्धतीने लग्नसोहळे पार पाडणे अशा सामाजिक सुधारणांना चालना मिळाली.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचले आणि देशाला आदर्श संविधान दिले. त्यांच्या विचारांचे केवळ अनुकरण न करता आचरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतापराव जाधव यांनी महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले. यावेळी योगेश जाधव, श्रीनिवास खेडेकर, महेंद्र पाटील, कमलाकर गवई, सुनील जगताप, चंद्रशेखर शुक्ल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version