शाळेतच नराधमाचे कृत्य; तीन तास तणावाचे वातावरण!
मेहकर/डोणगाव (तालुका प्रतिनिधी) : बदलापूरच्या घटनेने महाराष्ट्र अद्याप सावरलेला नसतानाच, बुलढाणा जिल्ह्यातील लोणी गवळी येथे एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नऊ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. या संतापजनक प्रकारानंतर ग्रामस्थांनी ५८ वर्षीय नराधम शिक्षकाला शाळेतच बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी गवळी येथील प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर ही वेळ आली. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेतील शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे (वय ५८) याने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करून तिचे लैंगिक शोषण केले. हा प्रकार उघडकीस येताच गावात वणव्यासारखी बातमी पसरली. काही वेळातच शेकडो ग्रामस्थ आणि महिलांनी शाळेवर धाव घेतली. संतापलेल्या जमावाने या नराधम शिक्षकाला वर्गाबाहेर काढून चांगलाच चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, नराधमाला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांना रोखून धरले. शाळेच्या परिसरात जवळपास तीन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढून आरोपीला आपल्या वाहनात बसवून पोलीस ठाण्याकडे रवाना केले.
सेवानिवृत्तीला दीड महिनाच बाकी असताना घृणास्पद कृत्य
विशेष म्हणजे, आरोपी महादेव मानतोडे हा येत्या ३१ मे रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होणार होता. सेवेला केवळ दीड महिना शिल्लक असताना, वयाच्या ५८ व्या वर्षी या शिक्षकाने गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जानेफळ पोलीस स्थानकाच्या हद्दीतही नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, अशा नराधमाला कठोर शासन करण्याची मागणी केली जात आहे.

