आमदारकीच्या हॅटट्रिकसह मंत्रिपदाचे वेध लागलेल्या आ.श्वेताताईंची कोंडी करण्यासाठी विरोधक एकवटले; राजकीय संघर्षाने चिखली पेटणार!
बुलढाणा (बाळू वानखेडे) : जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाचे राजकारण सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. सत्तेत एकत्र असूनही शिवसेनेच्या (शिंदे गट) आक्रमक आमदारांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात सुरू केलेली मोर्चेबांधणी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांना जे मागील निवडणुकीत जमले नाही, ते आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी करून दाखवण्याचा चंग बांधल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, भाजप आमदार श्वेताताई महाले यांच्या राजकीय वर्चस्वाला स्वकीयांकडूनच सुरुंग लावला जातो की काय, अशी चिन्हे चिखलीत उमटू लागली आहेत.
चिखलीच्या राजकारणात सध्या एक नवा ‘त्रिकोण’ आकाराला येत आहे. कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे आणि शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांच्यात अलीकडे वाढलेली जवळीक अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. त्यातच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचीही या गोटात भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तिन्ही नेत्यांची ‘राजकीय’ किंवा प्रसंगी ‘अराजकीय’ ठरू शकणारी ही मैत्री श्वेताताई महाले यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही ‘मैत्री’ भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण करणारी ठरत आहे.
‘बाहेरच्या’ नेतृत्वाला चिखली स्वीकारणार का?
आमदार संजय गायकवाड यांनी चिखलीत आपली राजकीय ताकद अजमावण्यास सुरुवात केली असली, तरी त्यांच्यासमोर स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे. चिखलीचा मतदार हा नेहमीच स्थानिक नेतृत्वाला पसंती देणारा राहिला आहे. अशा स्थितीत आ. गायकवाड यांनी शिंदे गटासाठी केलेली ही बांधणी किती ‘फलदायी’ ठरेल की ती ‘वांझोटी’ ठरेल, याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत.
दुसरीकडे, भाजप आमदार श्वेताताई महाले यांनी आपल्या मतदारसंघात मजबूत पकड निर्माण केली आहे. भाजपकडून त्यांच्याकडे ‘भावी खासदार’ म्हणूनही पाहिले जाते. जर त्यांनी आगामी निवडणुकीत आमदारकीची ‘हॅटट्रिक’ साधली, तर त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान निश्चित मानले जात आहे. यामुळेच त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी विरोधकांसह मित्रपक्षातील प्रतिस्पर्धीही सक्रिय झाले आहेत. चिखलीत सुरू असलेल्या या हालचाली केवळ एका विधानसभा मतदारसंघापुरत्या मर्यादित नसून, त्याचे दीर्घकालीन परिणाम बुलढाणा जिल्ह्याच्या सत्तेच्या समीकरणांवर होणार आहेत. महायुतीमधील हा अंतर्गत कलह आगामी काळात काय वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

