– चार आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी; पोलिसांची कारवाई सुरूच!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथून जवळच असलेल्या गुंज येथे शिवजयंती मिरवणुकीत झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश माधवराव तुपकर यांना मोठा दणका बसला आहे. मेहकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी (७ एप्रिल) फेटाळून लावला. दरम्यान, या प्रकरणातील फरार असलेल्या आणखी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांची रवानगी बुलढाणा कारागृहात (न्यायालयीन कोठडी) करण्यात आली आहे.
दि. १९ फेब्रुवारी रोजी गुंज येथे शिवजयंती मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजावरून दोन गटांत वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन पाच जण जखमी झाले होते. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटांतील एकूण १९ जणांवर गुन्हे दाखल केले होते. घटनेच्या दिवशीच पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती, तर कारवाईच्या भीतीने इतर आरोपी फरार झाले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून साखरखेर्डा पोलीस फरार आरोपींच्या मागावर होते. तपासादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईचा घटनाक्रम खालीलप्रमाणे:
-
२० मार्चची कारवाई: पोलिसांनी शाम सुरेश तुपकर, पवन परसराम तायडे आणि अक्षय रामकिशन तुपकर या तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना सुरुवातीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली व त्यानंतर २१ मार्च रोजी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
-
१ एप्रिलची कारवाई: पोलिसांचे शोधसत्र सुरूच असताना १ एप्रिल रोजी अमोल सुरेश तुपकर, गजानन केशव तुपकर, ऋतिक गजानन तुपकर आणि कडूबा मनोहर तुपकर या आणखी चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
-
बुलढाणा कारागृहात रवानगी: या चारही आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर २ एप्रिल रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत (बुलढाणा कारागृह) रवानगी करण्यात आली.
या प्रकरणातील संशयित आरोपी व माजी सभापती सुरेश तुपकर यांनी अटकेची टांगती तलवार असल्याने मेहकर येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील सुनावणी दरम्यान, साहाय्यक सरकारी वकील विनोद नरवाडे पाटील यांनी पोलिसांच्या बाजूने भक्कम युक्तिवाद केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला जामीन का मिळू नये, हे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ७ एप्रिल रोजी सुरेश तुपकर यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. जामीन फेटाळल्याने आता पोलिसांकडून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

