– मेहकर-पुणे बस साखरखेर्ड्यात पाच तास खोळंबली; वाहतूक निरीक्षकांच्या हलगर्जीबद्दल प्रवाशांमध्ये संताप!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) मेहकर आगाराचा भोंगळ आणि अमानवीय कारभार चव्हाट्यावर आला आहे. प्रकृती बिघडलेली असतानाही चालकाला सक्तीने कर्तव्यावर पाठवल्याने मंगळवारी (७ एप्रिल) मेहकर-पुणे बसला साखरखेर्डा येथे तब्बल पाच तास थांबावे लागले. अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीमुळे पुण्याकडे जाणाऱ्या सुमारे ४० प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
मेहकरवरून पुण्याकडे जाणारी एसटी बस (क्र. एमएच ४०- व्ही ५७५१) मंगळवारी सकाळी ७ वाजता नियमित वेळेवर साखरखेर्डा बसस्थानकावर पोहोचली. मात्र, येथे पोहोचताच बसचे चालक एस. एस. निकम यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्राप्त माहितीनुसार, चालक निकम यांनी रात्रीच सहायक वाहतूक निरीक्षक राकेश चौधरी यांना आपली प्रकृती ठीक नसल्याची कल्पना दिली होती. मात्र, आगारातील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव आणून त्यांना सक्तीने ड्युटीवर पाठवले. साखरखेर्ड्यात प्रकृती अधिकच खालावल्याने निकम यांनी पुन्हा आगाराशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.
चालकाने माहिती देऊनही मेहकर आगार प्रशासनाने तातडीने कोणतीही पावले उचलली नाहीत. अधिकाऱ्यांनी तब्बल दोन तास उशिराने, म्हणजेच सकाळी ९ वाजता पर्यायी चालक एस. यू. घुबे यांना फोनवरून बोलावणे धाडले. त्यानंतर सकाळी ११ वाजता नवीन चालक साखरखेर्ड्यात पोहोचले आणि बस पुण्याकडे रवाना झाली. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे एसटीतील प्रवाशांना सकाळी ७ ते ११ असे तब्बल पाच तास बसस्थानकावर ताटकळत बसावे लागले. प्रवाशांना वाऱ्यावर सोडणारे वाहतूक निरीक्षक अतुल सोनवणे व सहायक निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मनमानी कारभाराविषयी प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चालक निकम यांची प्रकृती बिघडल्याचे पाहून एसटी प्रशासनाऐवजी बसस्थानकावरील प्रवाशांनीच माणुसकी दाखवली. बसस्थानकावर उपस्थित असलेले सर्जेराव मंडळकर यांनी तातडीने पुढाकार घेत चालक निकम यांना स्थानिक दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले. सध्या चालकाची प्रकृती स्थिर असली तरी, मेहकर आगारातील एकाही जबाबदार अधिकाऱ्याने त्यांची साधी विचारपूसही केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीत कसूर नको म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना महामंडळ प्रशासन कशा प्रकारे वागणूक देते, याचीच प्रचिती या घटनेतून आली आहे.
“मेहकर-पुणे ही बस आमच्या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे. आजारी चालकाला जबरदस्तीने बसवर पाठवून एसटी प्रशासनाने केवळ चालकाच्याच नव्हे, तर ४० प्रवाशांच्याही जिवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन विभागीय नियंत्रकांनी संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी.” – ललितकुमार अग्रवाल, स्थानिक व्यापारी, साखरखेर्डा

