– बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथील काळजाचा ठोका चुकवणारी घटना!
– रविवारी सुरू झाला होता उलट्या आणि मळमळीचा त्रास
– तीन वर्षीय चिमुकलीची प्रकृती स्थिर; पोलिसांकडून तपास सुरू
धाड (जि. बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे एकाच कुटुंबातील पाच जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यामध्ये तीन सख्ख्या चिमुकल्या भावंडांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर आई आणि एका तीन वर्षीय मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच घरातील तीन कोवळ्या जीवांचा असा अकाली अंत झाल्याने धाडसह संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय ४), मशिरा मोहंमद वसीम जमदार (वय ७) आणि फातिमा मोहंमद वसीम जमदार (वय ८) या तीन लहानग्यांचा समावेश आहे. तर, आई अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय ३४) आणि अश्मिरा वसीम जमदार (वय ३) यांच्यावर बुलडाणा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जमदार कुटुंबातील सदस्यांना रविवारी अचानक पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला हा किरकोळ त्रास वाटला, मात्र सोमवारी सकाळी सर्वांची प्रकृती अधिकच बिघडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान सुरुवातीला अली आणि मशिरा या दोन भावंडांचा मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरत नाही तोच, सायंकाळी पावणेआठच्या सुमारास फातिमा हिचीही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आई अफरीन यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, फातिमा आणि अश्मिरा यांच्यावर बालरोगतज्ज्ञांच्या निगराणीखाली उपचार सुरू होते.
सध्या तीन वर्षीय अश्मिराची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा संपूर्ण प्रकार अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नेमकी विषबाधा कशातून झाली, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. मात्र, हसत्या-खेळत्या घरातील तीन चिमुकल्यांनी अचानक जग सोडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

