– बुलडाण्यात ‘वंचित’चा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बनवले कांदापोहे!
– गॅसअभावी बळी जाणाऱ्यांना जबाबदार कोण? निलेश जाधवांचा जळजळीत सवाल
बुलडाणा (बाळू वानखेडे) : “अच्छे दिन”च्या गप्पा मारणाऱ्या दिल्लीश्वरांच्या राज्यात आज माय-भगिनींवर पुन्हा एकदा लाकूड-फाटा गोळा करून चुली पेटवण्याची वेळ आली आहे. “नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर?” असा संतप्त सवाल विचारत आज (दि.6) बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीने जोरदार रणशिंग फुकले. गॅसच्या कृत्रिम टंचाईने जनतेचे कंबरडे मोडले असून, “आज चूल पेटवली आहे, भविष्यात गॅस मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय पेटवू!” असा जळजळीत इशारा वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी दिला आहे.
वंचित आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी ११ मार्च रोजीच गॅस टंचाईचे संकट येणार असल्याची चेतावणी दिली होती. आज ती अक्षरशः खरी ठरली आहे. चहाच्या टपऱ्या बंद झाल्या, हॉटेलमधील शेगड्या विझल्या आणि मेस बंद झाल्यामुळे विद्यार्थी उपाशी पोटी गावाकडे परतत आहेत. केटरिंग व्यावसायिकांचे आणि रिक्षाचालकांचे जगणे या सरकारने कठीण करून टाकले आहे. मोदी सरकारचा ‘नियोजनाचा अभाव’ आज छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर लाथ मारत आहे, अशी घणाघाती टीका निलेश जाधव यांनी केली.
एकडे सामान्यांना गॅस मिळेना आणि दुसरीकडे ५ ते ७ हजार रुपयांना सिलेंडरचा काळाबाजार सुरू आहे. काही ठिकाणी तर चक्क सिलेंडरमध्ये पाणी भरून देण्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. “सरकार म्हणतंय परिस्थिती सामान्य आहे, मग लोक रांगेत का मरतायत?” असा सवाल विचारत प्रशासनाच्या खोटेपणाचा बुरखा फाडण्यात आला.
मागण्यांचा वज्रप्रहार: १. गॅसची कृत्रिम टंचाई आणि काळाबाजार तातडीने रोखा. २. २५ दिवसांच्या वेटिंगची अट शिथिल करा. ३. विद्यार्थ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ सुरू करून जेवणाची व्यवस्था करा. ४. तातडीने KYC शिवाय गॅस द्या आणि उज्ज्वला योजनेचे ऑडिट करा.
या आंदोलनात वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्यासह मनोज खरात (तालुकाध्यक्ष), विशाल गवई (युवा जिल्हाध्यक्ष), समाधान डोंगरे, भीमराव शिरसाठ, शेषराव मोरे, विलास प्रधान, संजय खराटे, अनिल जाधव, श्रीकृष्ण खरात, रमेश खरात, अरुण खरात, गजानन खरात, देवलाल मांडवे, रमेश मांडवे, कृष्णा बनकर, मिलिंद वानखेडे, नामदेव अवसरमोल, तुकाराम रावळकर, कोंडू रामेकर, कलाबाई सुरोशे, बाळासाहेब गवई, पुरुषोत्तम वाकोडकर, दिलीप पवार, वासुदेव गरुडे, रविंद्र सुरडकर, अतिश बोर्डे, मनिष भालेराव, अशोक सपकाळ, अशोक सरदार, रामेश्वर सरदार, संतोष सपकाळ, संतोष जाधव, धोंडू पठ्ठे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

