साखरखेर्डा पशुवैद्यकीय दवाखान्याला कुलूप; चार पदे रिक्त, पशुपालक वाऱ्यावर!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– परिसरातील ३० ते ३५ गावांचा प्रश्न; इमारतीचा वापर जुगारासाठी, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील पशुपालनासाठी महत्त्वाचे केंद्र असलेल्या साखरखेर्डा येथील ‘श्रेणी-१’ पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दवाखान्यात एकही डॉक्टर किंवा कर्मचारी उपलब्ध नसल्याने हा दवाखाना पूर्णपणे बंद आहे. परिणामी, परिसरातील ३० ते ३५ गावांमधील शेतकऱ्यांना आपल्या मुक्या जनावरांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

साखरखेर्डा परिसरात शेळीपालन आणि गोपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. एकट्या साखरखेर्डा भागात पाच हजारांहून अधिक शेळ्या आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल, गाय, म्हैस यांसारखी दुभती व कामाची जनावरे आहेत. या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारने येथे श्रेणी-१ चा दवाखाना मंजूर केला. मात्र, प्रशासकीय उदासिनतेमुळे या दवाखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यांच्या जागी नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत.

शासनाने याठिकाणी दवाखाना आणि कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी चार टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतींचे कुलूप उघडले गेलेले नाही. दवाखाना बंद राहत असल्याने रिकाम्या पडलेल्या या इमारतींच्या परिसरात आता जुगारींचा वावर वाढला आहे. या शासकीय जागेत खुलेआम ताश पत्ते खेळले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, प्रशासनाचा कोणताही वचक उरलेला नाही.

खासगी डॉक्टरांचाच आधार

दवाखाना बंद असल्याने शेतकऱ्यांना तातडीच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांना पाचारण करावे लागते. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा खर्च पेलवणारा नाही. सिंदखेडराजा तालुक्यात श्रेणी-१ चे केवळ दोनच दवाखाने आहेत, त्यातील साखरखेर्डा केंद्र बंद असल्याने पशुपालकांमध्ये संतापाची लाट आहे.

“जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे. साखरखेर्डा येथील रिक्त पदे भरून हा दवाखाना पुन्हा कार्यान्वित करावा, जेणेकरून शेतकऱ्यांची ससेहोलपट थांबेल.”

— स्थानिक शेतकरी व पशुपालक

Share This Article
Exit mobile version