मेहकरमध्ये ‘मशाल’ धगधगली; शिंदे गट, भाजपा अन् काँग्रेसला मोठे भगदाड!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्षांसह आजी-माजी सरपंचांचा ‘मातोश्री’वर शिवबंधनात प्रवेश; आमदार सिद्धार्थ खरात यांची ताकद वाढली!

मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) : मेहकर विधानसभा मतदारसंघात भगवा सप्ताहाचा धमाका सुरूच असून, सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विरोधी पक्षांना जोरदार धोबीपछाड दिली. शिंदे गट, भाजपा आणि काँग्रेसमधील बड्या पदाधिकाऱ्यांनी आज ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती ‘मशाल’ घेतली. काँग्रेसचे ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष आणि डझनभर आजी-माजी सरपंचांनी शिवबंधनात प्रवेश केल्याने मेहकरमध्ये विरोधकांचे अक्षरश: पानिपत झाले आहे.

आमदार सिद्धार्थ खरात आणि जिल्हा उपप्रमुख प्रा. आशीष राहाटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. फुटीर गट आणि भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळून कार्यकर्त्यांनी आता निष्ठेच्या मशालीचा मार्ग स्वीकारला असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

या ऐतिहासिक पक्षप्रवेशात काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन खरात यांच्यासह लोणार आणि मेहकर तालुक्यातील बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये:

  • सोपान सोनोने (सरपंच, देऊळगाव वायसा)
  • विलास मोरे (सरपंच, धाड)
  • साहेबराव वाठोरे (सरपंच, सोनुना)
  • केशवराव वानखडे (सरपंच, उमरा देशमुख)
  • तेजराव अवसरमोल (आजी सरपंच)

यांच्यासह एकूण ६ आजी आणि ८ माजी सरपंचांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. तसेच भाजपा आणि शिंदे गटातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत मशाल हाती घेतली.

नेत्यांची मांदियाळी

या सोहळ्याप्रसंगी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, माजी खासदार चंद्रकांत खैरे, बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा उपप्रमुख प्रा. आशीष राहाटे, डॉ. सार्थ खरात, लोणार तालुका प्रमुख राजू बुधवंत, युवा सेना जिल्हा समन्वयक जीवन घायाळ यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

“मेहकरमध्ये गद्दारांना जागा नाही, हे आजच्या पक्षप्रवेशाने सिद्ध केले आहे. सर्वसामान्यांचा ओढा फक्त उद्धवजींच्या शिवसेनेकडेच आहे,” असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. या मोठ्या राजकीय भूकंपामुळे आगामी निवडणुकांपूर्वीच मेहकर मतदारसंघात महाविकास आघाडीची आणि शिवसेनेची बाजू भक्कम झाली आहे.

Share This Article
Exit mobile version