चिखलीचे राजकारण : विकासाची ‘नीती’ विरुद्ध निव्वळ आरोपांची ‘खेळी’!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

दोन दशकांचा वारसा आणि संघर्षाचा प्रवास; आमदार श्वेताताई महाले यांच्या कार्याचा वेध!

सुरेश इंगळे पाटील

चिखली: राजकारणात वारसा मिळणे सोपे असते, पण तो टिकवणे आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणे ही एक खडतर तपश्चर्या आहे. सध्या चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले असून, आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र, या चिखलीच्या मातीत ज्यांनी समाजकारणाचे बीज पेरले, त्या दयासागर महाले आणि अंकुशराव पाटील या दोन ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांच्या स्वप्नांतून आकाराला आलेले नेतृत्व म्हणजे आमदार श्वेताताई महाले आणि विद्याधर महाले.

२०१३-१४ चा काळ आठवला की, एक चित्र स्पष्ट डोळ्यांसमोर उभे राहते. श्वेताताई तेव्हा राजकारणात नवख्या होत्या. एकाच गाडीतून प्रवास करताना ज्येष्ठ नेते दयासागर महाले आणि अंकुशराव पाटील यांच्यात सतत चर्चा असायची. ही चर्चा स्वतःच्या पदासाठी नव्हती, तर “आपल्या मुलांनी गोरगरीब, दलित आणि कष्टकऱ्यांची सेवा करावी, समाजाला एकत्र जोडावे आणि मायभूमीचा विकास करावा,” हाच त्यांचा ध्यास होता. त्या संस्कारांची शिदोरी घेऊनच या दाम्पत्याने राजकारणात पाऊल ठेवले.

२०१४ मध्ये विधानसभेची उमेदवारी हुकली, तरीही श्वेताताई डगमगल्या नाहीत. जनसंपर्क सुरूच राहिला. दिवंगत लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून त्यांना जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरवले. तिथूनच चिखलीच्या राजकारणाची समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली. प्रस्थापित नेतृत्वाच्या पायाखालची वाळू सरकू लागली, कारण जनतेला आता विकासाचा नवा चेहरा दिसत होता.

२०१९ च्या निवडणुकीत समोर मोठे आव्हान होते. एका बाजूला शिक्षणमहर्षीच्या नावाखाली संस्थांचे साम्राज्य उभे करणारे, सूतगिरणी आणि जिल्हा बँकेसारख्या संस्थांना डबघाईला आणणारे राजकारण होते, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांच्या जमिनी आणि हक्कांचे रक्षण करण्याची जिद्द असलेले महाले दाम्पत्य. पराभवाच्या भीतीने चिडलेल्या विरोधकांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यापर्यंत मजल मारली, पण चिखलीच्या जनतेने विकासाला साथ दिली.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून विद्याधर महाले यांनी आणि आमदार म्हणून श्वेताताईंनी चिखलीसाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला. रस्ते, दळणवळण आणि मूलभूत सुविधांचे जाळे विणले गेले. विरोधकांना हेच यश बघवत नसल्याने आता पुन्हा एकदा ‘खोटे आरोप’ आणि ‘भाड्याने आणलेली माणसे’ वापरून चिखलीची शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संस्कृती जपली, पण संघर्षही ठाऊक आहे!

“आम्ही हप्तेखोरी, गुंडगिरी किंवा भाईगिरी करत नाही, ही आमची संस्कृती नाही,” हे आज ठामपणे सांगावे लागते. विकास हेच आमचे उत्तर आहे. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही अन्याय सहन करू. राजकारणात संयम पाळणे ही दुर्बलता नसून संस्कार आहेत. चिखलीच्या विकासासाठी आणि जनतेच्या न्याय्य हक्कासाठी हा संघर्ष यापुढेही अधिक तीव्रतेने सुरूच राहील.


– सुरेश इंगळे पाटील (लेखक हे आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचे स्वीय सहाय्यक आहेत.)

Share This Article
Exit mobile version