काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रेंची जीभ घसरली; ‘कुंकू-मंगळसूत्रा’चा अपमान करणाऱ्या बोंद्रेंना चिखलीत रणरागिणींनी दाखवले जोडे!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– बुलढाण्यात संतापाचा वणवा; बोंद्रेंनी तोडले अकलेचे तारे: म्हणे, ‘महिला पतिव्रता असल्याचे दाखवण्यासाठी मोठे कुंकू आणि मोठे मंगळसूत्र घालते!’

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी): महाराष्ट्र ही राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमी आहे. या मातीत महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांची गय केली जात नाही, याचा विसर बहुदा काँग्रेसच्या नेत्यांना पडला आहे. बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी महिलांच्या सौभाग्यलेण्यांवरून केलेल्या एका अत्यंत हिणकस विधानामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाचा कडेलोट झाला आहे. स्वतःची राजकीय निष्ठा सिद्ध करण्यासाठी माता-भगिनींच्या कुंकू आणि मंगळसूत्राचा बाजार मांडणाऱ्या बोंद्रेंचा आज चिखलीच्या रणरागिणींनी भर चौकात ‘जोडे मारो’ आंदोलन करत धिक्कार केला.

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बोंद्रेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. “तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेत जाणार का?” असा सरळ सवाल पत्रकारांनी विचारला असता, राहुल बोंद्रेंचा तोल सुटला. आपली निष्ठा सांगताना त्यांनी महिलांच्या चारित्र्याचा आणि त्यांच्या श्रद्धेचा अपमान केला. “एखादी महिला पतिव्रता असल्याचे दाखवण्यासाठी मोठे कुंकू आणि मोठे मंगळसूत्र घालते,” असे अजब आणि वादग्रस्त तर्कट त्यांनी मांडले. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक घराघरातून आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राहुल बोंद्रेंचे हे ‘विषारी’ बोल वाऱ्यासारखे पसरताच चिखली शहरातील महिला रस्त्यावर उतरल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांनी बोंद्रेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संताप इतका अनावर होता की, आंदोलक महिलांनी बोंद्रेंच्या प्रतिमेला जोडे मारले आणि त्यांच्या पोस्टरवर कुंकू-मंगळसूत्र रेखाटून त्यांचा निषेध केला. “ज्या शब्दांनी महिलांचा अपमान केला, त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असा पवित्रा महिलांनी घेतला आहे.

एकीकडे नाशिकच्या भोंदूबाबाच्या प्रकरणाने राज्य हादरलेले असताना, एका जबाबदार लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे महिलांच्या अस्मितेवर चिखलफेक करणे हे दुर्दैवी आहे. “कुंकू आणि मंगळसूत्र ही काही ‘दिखाव्याची’ वस्तू नाही, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि अखंड सौभाग्याची प्रतीके आहेत,” अशा शब्दांत महिला व बालविकास सभापती सुषमा चव्हाण यांनी राहुल बोंद्रेंचा समाचार घेतला. बुलढाण्यातील हे राजकीय वातावरण आता केवळ पक्षांतरापुरते मर्यादित राहिले नसून, ते ‘स्त्री सन्माना’च्या लढाईत रूपांतरित झाले आहे. आता राहुल बोंद्रे माफी मागतात की जनतेचा रोष ओढवून घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


माफी मागा, अन्यथा घराबाहेर पडणे मुश्कील होईल! राजकीय चढाओढीत नेत्यांनी आपली पातळी इतकी खाली घसरवू नये की त्यांना घराबाहेर पडणे कठीण होईल. राहुल बोंद्रेंनी आपल्या विधानाबद्दल तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. “स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी महिलांच्या सन्मानाचा बळी देणाऱ्या अशा नेत्यांना जनता कधीच माफ करणार नाही,” अशी चपराकही चिखलीतील महिलांनी लगावली आहे.

Share This Article
Exit mobile version