सर्पदंशाने १९ वर्षीय युवतीचा मृत्यू

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-झोपेत असताना विषारी सापाचा दंश; उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

देऊळगाव कुंडपाळ (वाजिद खान) : येथील एका १९ वर्षीय युवतीचा शुक्रवारी रात्री झोपेत असताना विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील रवींद्र शेषराव सानप यांची १९ वर्षीय मुलगी कु. साक्षी ही आई-वडिलांसमवेत झोपलेली असताना विषारी सापाने तिला दंश केला. सकाळी उठल्यानंतर तिच्या घशात दुखत असल्याची तसेच अॅसिडिटीसदृश त्रास होत असल्याची तक्रार तिने केली. तत्काळ तिला लोणार येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी मेहकर येथे हलविण्यात येत होते. मात्र, रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, संबंधित साप शेजाऱ्यांच्या अंगणात आढळून आला. कु. साक्षी ही सुलतानपूर येथील बी. फार्मसी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. ती हुशार, मितभाषी व शांत स्वभावाची होती. तिच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वैद्यकीय तपासणीनंतर शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, आजी-आजोबा तसेच मोठा आप्तपरिवार आहे.

Share This Article
Exit mobile version