मैसूर विद्यापीठातून ‘विविधतेत एकता’चा संदेश; राष्ट्रीय एकात्मता शिबिरात महाराष्ट्राचे दमदार प्रतिनिधित्व

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-सहा राज्यांतील स्वयंसेवकांचा सहभाग; सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला उत्सव

आळंदी (अर्जुन मेदनकर) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संघाने कर्नाटक राज्यातील मैसूर विद्यापीठ येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिर २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत ‘विविधतेत एकता’ हा संदेश प्रभावीपणे दिला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेले हे शिबिर सर्वांसाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरले.

या शिबिरात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा आणि कर्नाटक या सहा राज्यांतील स्वयंसेवक सहभागी झाले होते. विविधतेतून एकतेचा संदेश देणाऱ्या या शिबिरात राष्ट्रसेवा, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित प्रेरणादायी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यामधून स्वयंसेवकांना राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पटवून देण्यात आले.

शिबिरादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत्य, गीत सादरीकरण तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र संघाने सादर केलेल्या वारी आणि गणेशोत्सवावर आधारित लोकनृत्याला विशेष दाद मिळाली. विविध राज्यांच्या संस्कृतींचा संगम या शिबिरात अनुभवता आला. या शिबिरात प्रा. दिलीप घुले (अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंग, पुणे) यांच्या नेतृत्वाखाली दिक्षा तुपेरे, अक्षदा पाचुंदकर, पूजा भामे, सिद्धी गावडे, महादेव स्वामी, श्रावणी पाटील, आदित्य बोरसे, मद्रे दिलीप, ओम पवार आणि सोहम आव्हाड यांनी सहभाग घेतला.

शिबिरात स्वच्छता अभियान, समूह चर्चा, नेतृत्व विकास उपक्रम तसेच विविध सामाजिक विषयांवरील मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाली असून राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. गणेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

Share This Article
Exit mobile version