-लोणारच्या ‘झोपलेल्या मारुती’ मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात; ५८ जणांचे रक्तदान
लोणार (वाजिद खान) : विश्वप्रसिद्ध लोणार येथील ऐतिहासिक ‘झोपलेला मारुती’ (मोठा मारुती) मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा अत्यंत भव्य आणि उत्साहात पार पडला. या सोहळ्यात भक्तीबरोबरच समाजसेवेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. उत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ५८ दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या प्रसंगी केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी मंदिराला भेट देऊन मारुतीरायाचे दर्शन घेतले. संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांनीही उपस्थित राहून दर्शन घेतले आणि उपक्रमांचे कौतुक केले. यावर्षीचा सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्याने भाविकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, पुढील वर्षी हा उत्सव अधिक भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा मानस मंदिर संस्थानने व्यक्त केला आहे.

