लोणार सरोवर विकासाला नवी दिशा

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-नव्या रूपात झळकणार उल्कापाताच्या खुणा

लोणार (वाजिद खान) : जागतिक वारसा स्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन आणि विकासाला आता नवी दिशा मिळत आहे. लोणार सरोवर विकास आराखड्यांतर्गत वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ९ कोटी ८८ लाख १० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास नियोजन विभागाने मंजुरी दिली आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत शासनाने हा निधी तातडीने उपलब्ध करून दिला आहे.

लोणार सरोवराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची आवश्यकता असल्याचे नमूद करत अमरावती विभागीय आयुक्तांनी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्य शासनाकडे पत्राद्वारे मागणी केली होती. सरोवराचे जतन व विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांना गती देण्यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून शासनाने हा निधी प्रशासकीय नियंत्रक म्हणून विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द केला आहे.

आराखड्याचे स्वरूप आणि विकासकामे

लोणार सरोवराच्या जतन आणि संवर्धनासाठी एकूण ४३४.६१ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. या आराखड्यांतर्गत सरोवराचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखणे, परिसरातील जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि पर्यटकांसाठी जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा निर्माण करणे ही मुख्य उद्दिष्टे आहेत. या योजनेत सरोवराच्या काठावरील प्राचीन मंदिरांचे जतन, पर्यटकांसाठी पदपथ (पायवाटा), संरक्षक भिंतींचे बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन आणि निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करणे यांसारख्या विविध कामांचा समावेश आहे.

आतापर्यंत १२३.२४ कोटींचा निधी खर्च

या विकास प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण १२३.२४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. ताज्या शासन निर्णयानुसार मंजूर झालेला ९.८८ कोटी रुपयांचा निधी विविध प्रलंबित कामांसाठी वापरण्यात येणार आहे. या निधीमुळे आराखड्यातील अपूर्ण कामांना गती मिळणार असून, लोणार सरोवराचा कायापालट होण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. या कामांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याची जबाबदारी अमरावती विभागीय आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.

Share This Article
Exit mobile version