आळंदीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात; विविध धार्मिक परंपरांनी सोहळा साजरा

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-माऊली मंदिरासह पंचक्रोशीत कीर्तन, महाप्रसाद व भक्तीमय कार्यक्रमांनी वातावरण भारावले

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी येथील माऊली मंदिरासह पंचक्रोशीतील विविध श्री हनुमान मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. माऊली मंदिर, आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट, शनि मारुती मंदिर, काळा मारुती, श्री मारुती देवस्थान, हजेरी मारुती मंदिर आदी ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आवेकर भावे रामचंद्र संस्थानच्या वतीने श्रीराम मंदिरात हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्या वतीने महाप्रसाद वाटप सेवा आयोजित करण्यात आली. श्रींचा रुद्राभिषेक विश्वस्त अर्जुन मेदनकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी गोविंद ठाकूर, लक्ष्मण मेदनकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, उदय काळे, बाबासाहेब भंडारे, महेश अयाचित गुरुजी, साहेब महाजन, रामदास दाभाडे, अप्पा महाराज पवार, कृष्णाजी डहाके, हमीद शेख, गौतम पाटोळे, विश्वंभर पाटील, विलास वाघमारे, डॉ. राजेंद्र जाधव, रोहिदास कदम, नितीन ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी स्वरअन्वय निर्मित महेश देशपांडे यांच्या सुमधुर भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने वातावरण भक्तीमय झाले. नामस्मरण, संत अभंग आणि श्री पांडुरंग, श्री मारुती तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगांनी भाविक मंत्रमुग्ध झाले. गायक महेश देशपांडे, निवेदिका रुपाली देशपांडे, गायिका दुर्वा तेली, तबलावादक मयूर खेडकर आणि पखवाज वादक शिवनारायण काशीद यांनी कार्यक्रमात साथ दिली. संस्थानच्या वतीने कलाकारांचा सन्मान करण्यात आला. माऊली मंदिरात प्रथेनुसार ह.भ.प. बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे कीर्तन झाले. तसेच गोपाळपुरातील मारुती देवस्थानच्या वतीने हरिनाम गजरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या कीर्तन सेवेलाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आळंदी परिसरातील विविध मठ, मंदिरे आणि धर्मशाळांमध्ये कीर्तन, भजन, अभंगगायन, महाप्रसाद वाटप यांसारखे कार्यक्रम पार पडले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. हजेरी मारुती मंदिरात आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे परिसर भक्तांनी गजबजून गेला. हनुमान जन्मोत्सव निमित्त पहाटेपासूनच कीर्तन, आरती, पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने महाआरती, दूध महाप्रसाद वाटप करण्यात आले. इंद्रायणी नगर येथील मारुती मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. एकूणच, आळंदीतील हनुमान जन्मोत्सव भक्ती, परंपरा आणि उत्साहाचे दर्शन घडवणारा ठरला.

Share This Article
Exit mobile version