विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अर्थसहाय्य मिळण्यासाठी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र (UDID) सादर करणे अनिवार्य

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-UDID नसल्यास पुढील महिन्याचे अर्थसहाय्य बंद होणार; लाभार्थ्यांना तातडीचे आवाहन :-  विजय सवडे (तहसीलदार, चिखली)

राजेंद्र घुबे (देऊळगाव घुबे) : शासनाकडून विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अर्थसहाय्याचे वितरण करण्यात येते. राज्य शासन, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या शासन निर्णय क्रमांक : दिव्यांग-2026/प्र.क्र.33/कार्यासन-1, दिनांक 27 मार्च 2026 अन्वये सदर अर्थसहाय्य वितरणाकरिता प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्याकडे दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र (UDID) असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा UDID क्रमांक DBT पोर्टलवर अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विशेष सहाय्य योजनेच्या ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्याप त्यांचे UDID क्रमांक असलेले दिव्यांग प्रमाणपत्र व आधार कार्डाची छायांकित प्रत तहसील कार्यालयात जमा केलेली नाही, त्यांनी तात्काळ प्रमाणपत्राची छायांकित प्रत तहसील कार्यालयात जमा करावी. तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID क्रमांक असलेले दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र) नाही, अशा लाभार्थ्यांनी तात्काळ वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चिखली यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची नोंद UDID पोर्टलवर करून घ्यावी.

शासनाचा स्पष्ट इशारा
शासन निर्देशानुसार UDID प्रमाणपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यांना पुढील महिन्याचे अर्थसहाय्य वितरित होणार नाही.

शिबिरांचा लाभ घ्या
ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी दिव्यांग प्रमाणपत्राकरिता शिबीर आयोजित केले जाते. सदर शिबिराचा लाभ घेऊन दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र (UDID) प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार श्री. विजय सवडे यांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version