-नागरिकांनी केली तक्रार दाखल, चार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : मेहकर लघु पाटबंधारे विभागांतर्गत येत असलेला खडकपूर्णा नदीवरील दुसरबीड कोल्हापूर बंधारा 2025-26 या वर्षातील रब्बी हंगामाकरिता लोखंडी प्लेटच्या साह्याने बंद करण्यात आला होता. त्यामध्ये नदीपात्रातील पाणी अडवण्यात येऊन हे पाणी नदीकाठावरील गावांच्या पिण्याच्या व वापरासाठी उपयोगात आणले जात होते. तसेच या बंधाऱ्यातून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याचा पुरवठा केला जातो.
मात्र याच बंधाऱ्यावरील लोखंडी गेट उघडून रेती माफियांनी पाणी सोडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. किनगाव राजा पोलिसांनी चार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेतीच्या उपयोगासाठी हे पाणी वापरले जात असल्याने नदीपात्रातील पाणी महत्त्वाचे होते. मात्र पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील पाणी कमी झाले. त्यामुळे गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना कोरड्या पडल्या असून, कडक उन्हाळ्यात नागरिकांना तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान, परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या सूचनेनुसार खडकपूर्णा नदीवरील संत चोखामेळा धरणातून पाणी सोडण्यात आले. देऊळगाव मही ते वझर आघाव या दरम्यान नदीपात्रात हे पाणी सोडण्यात आले असून, ठिकठिकाणी बंधाऱ्यांमध्ये ते साठवण्यात आले.
मात्र, याच नदीवर शासनाकडून दुसरबीड रेती घाट मंजूर करण्यात आला आहे. सध्या नदीपात्रात पाणी साचलेले असल्यामुळे पोकलेन मशीनच्या साहाय्याने रेती उपसा सुरू आहे. पाण्याचा अडथळा दूर करण्यासाठी दुसरबीड कोल्हापूर बंधाऱ्यातील पाणी रात्रीच्या वेळी सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गावकऱ्यांना ही बाब लक्षात येताच ते घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत बंधाऱ्यातील बरेच पाणी वाहून गेले होते. घटनास्थळी लोखंडी जाड सळ्या, लाकडाची ढिमरे, वायर व जाड दोर आढळून आले. या प्रकरणी किनगाव राजा पोलीस स्टेशन येथे शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेले पाणी बंधाऱ्यातून सोडून देणे व रेती उपसा सुरू ठेवणे हे षड्यंत्र असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कडक उन्हाळ्यात शेतकरी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध व्हावे, तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने पाणी सोडण्यात आले होते. मात्र बंधाऱ्यातील पाणी सोडून पाणीटंचाईची समस्या निर्माण करणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी दिलेल्या फिर्यादीत दत्तात्रय नाथाभाऊ दराडे यांच्यासह चार जणांची नावे असून, त्यांच्या विरोधात किनगाव राजा पोलिसांनी पहाटे चार वाजता गुन्हा दाखल केला आहे.

