-पुरणपोळी महाप्रसादातून अन्नदानाचा अनोखा संगम; महिलांच्या सेवाभावाचे आकर्षण
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथे संत भगवान बाबांच्या नारळी सप्ताहाचा प्रारंभ भक्ती, सेवा आणि अन्नदानाच्या अद्वितीय संगमाने झाला. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी पुरणपोळीच्या महाप्रसादाने हजारो भाविकांचे मन जिंकले, तर गावकऱ्यांच्या सेवाभावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
छोट्याशा बडेवाडी गावाने पुन्हा एकदा “गाव लहान पण मन मोठं” हे सिद्ध करून दाखवले. सुमारे वीस वर्षांपूर्वी स्वीकारलेली नारळी सप्ताहाची परंपरा आजही तेवढ्याच निष्ठेने आणि नियोजनाने जोपासली जात आहे.
महिलांचा पुढाकार ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
गावातील महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत सेवेत स्वतःला झोकून दिले. पहाटेपासूनच प्रत्येक घरात चूल पेटली आणि हजारो पुरणपोळ्या तयार करण्यात आल्या. बडेवाडी, बोंदरवाडी आणि येळी या तीन गावांतील प्रत्येक घरातून जवळपास एक लाख पुरणपोळ्या तयार करून वाजत-गाजत सप्ताहस्थळी आणण्यात आल्या. महिलांनी केवळ स्वयंपाकच नव्हे, तर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना बसल्या जागी पाणी पुरवण्याची जबाबदारीही पार पाडली. त्यामुळे सप्ताहात येणाऱ्या भाविकांना घरच्यासारखी ऊब आणि सेवा अनुभवायला मिळत आहे.
लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग
गावातील प्रत्येक घर आणि प्रत्येक व्यक्ती या सप्ताहात सहभागी झाली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना कामांचे वाटप करण्यात आले असून गावात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळी-दसऱ्यासारखाच उत्साह या धार्मिक सोहळ्यात पाहायला मिळत आहे.
महंतांचे आवाहन
श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी बडेवाडीच्या सेवाभावाचे कौतुक करत आवाहन केले की, “गावाची लोकसंख्या कमी असली तरी श्रद्धा अफाट आहे. लाखो भाविकांची सेवा करण्यासाठी परिसरातील गावांनी पुढाकार घ्यावा आणि बडेवाडीला सहकार्य करावे.”
भावना, भक्ती आणि सेवा यांचा संगम
बडेवाडीतील नारळी सप्ताह हा केवळ धार्मिक सोहळा नसून एक सामाजिक यज्ञ ठरत आहे. पुरणपोळीच्या गोडीतून व्यक्त होणारी माणुसकी आणि महिलांच्या सेवाभावातून उमटणारी संस्कृती यामुळे हा सप्ताह भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.

