– समृद्धी महामार्गावर मृतदेह फेकला गेल्याचा संशय; फुलंब्री पोलिसांकडून सखोल तपास करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) : नालेगाव परिसरातील रहिवासी राजू सुधाकर जिरेकर यांचा समृद्धी महामार्गावर झालेला मृत्यू अपघाती नसून, तो पूर्वनियोजित घातपात असल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी केवळ अपघाताची नोंद न ठेवता ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) २०२३ अंतर्गत हत्या, अपहरण आणि पुरावा नष्ट करण्याच्या कोनातून सखोल तपास करावा, अशी मागणी सर्वस्तरातून पुढे आली आहे. या संदर्भात लवकरच ग्रामीण पोलीस अधीक्षकांना सविस्तर निवेदन दिले जाणार आहे.
राजू जिरेकर हे शनिवार, १४ मार्च रोजी रात्री ११.३० च्या सुमारास जेवण करून घराबाहेर पडले होते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलनगर (नालेगाव) येथील एका पानटपरीवर मित्रांशी चर्चा सुरू असताना त्यांचा काही व्यक्तींशी तीव्र वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन संशयितांनी जिरेकर यांना चारचाकी वाहनातून अज्ञात स्थळी नेले असावे. त्यानंतर त्यांची हत्या करून हा प्रकार अपघाती वाटावा, यासाठी मृतदेह समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ४२१.८ (सावंगी इंटरचेंज) जवळ फेकून दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणात राजू जिरेकर हे घराबाहेर पडताना आपला मोबाईल घरीच विसरले होते. मात्र, ज्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात या घटनेची प्रथम माहिती दिली, त्याच व्यक्तीकडे जिरेकर यांचा फोन आढळून आला. संबंधित व्यक्तीने हा फोन नुकताच कुटुंबीयांना परत केल्याने संशयाची सुई अधिक गडद झाली आहे. या मोबाईलचे तातडीने ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करून त्यातील डिलीट केलेला डेटा आणि चॅट्स तपासावेत, अशी मागणी पुढे आली आहे.
घटनेच्या रात्री ११.३० ते पहाटे ३.४५ या दरम्यान नेमके काय घडले, हे शोधण्यासाठी नारेगाव, विठ्ठलनगर आणि समृद्धी महामार्गावरील सावंगी इंटरचेंज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची गरज आहे. तसेच, मयत आणि संशयित व्यक्तींचे टॉवर लोकेशन, गुगल टाइमलाइन आणि सॅटेलाईट इमेजेसची तांत्रिक तपासणी केल्यास हत्येचा छडा लागू शकतो. या प्रकरणात ‘बीएनएस’मधील कलम १०३(१) (हत्या), १४० (अपहरण), ६१ (गुन्हेगारी कट) आणि २३८ (पुरावा नष्ट करणे) या कलमांचा अंतर्भाव करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मयत राजू जिरेकर हे माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे आणि ज्येष्ठ पत्रकार व संपादक मनोज सांगळे यांचे जावई होत. या घटनेमुळे जिरेकर व सांगळे कुटुंबावर शोककळा पसरली असून, आरोपी अद्याप मोकाट असल्याने कुटुंबीयांनी पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे. आता पोलीस या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास तांत्रिक पद्धतीने कसा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

