– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेच्या अंमलबजावणीला गती; २४.७३ लाख खातेदारांना लवकरच दिलासा!
मुंबई/ बुलढाणा (बाळू वानखेडे) : राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या योजनेसाठी आवश्यक असलेला राज्यस्तरीय बँकर्स समितीचा (SLBC) सविस्तर अहवाल आता अंतिम टप्प्यात असून, यामुळे राज्यातील सुमारे २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही दिवसांतच हा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत.
राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करून बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. या घोषणेनंतर सहकार विभागाने युद्धपातळीवर माहिती संकलित करण्याचे काम हाती घेतले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची आकडेवारी मागवण्यात आली होती. या छाननीनंतर आता लाभार्थी शेतकऱ्यांची निश्चिती झाली असून, बँकर्स समितीच्या अहवालाद्वारे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळच्या कर्जमाफी योजनेचे स्वरूप केवळ पीक कर्जापुरते मर्यादित न ठेवता ते अधिक व्यापक करण्यात आले आहे. केवळ अल्पमुदत पीक कर्जच नव्हे, तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जांचाही यात समावेश करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेले पात्र शेतकरी या सवलतीसाठी पात्र ठरतील. तसेच, आधार प्रमाणीकरण आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे.
प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात!
बँकर्स समितीचा हा अहवाल प्राप्त होताच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने निधी वितरणाचा कार्यक्रम निश्चित केला जाईल. विशेषतः खरीप हंगाम तोंडावर असताना ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान सरकारसमोर असेल. बँकांकडून आलेल्या माहितीनुसार, पात्र लाभार्थ्यांची संख्या २५ लाखांच्या घरात जात असल्याने सरकारी तिजोरीवर पडणारा नेमका भार किती असेल, याची स्पष्टताही या अहवालातून होणार आहे.

