-संदीप शेळके यांच्या जिल्हा संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : काँग्रेस नेते संदीप शेळके यांच्या दि. २४ व २५ मार्च रोजी झालेल्या जिल्हा संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत त्यांनी हितगुज साधले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारांसोबत ठामपणे राहण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच संघटना बांधणीबाबत तळमळ व्यक्त केली.
शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा वारसा जपण्यासाठी काँग्रेसमध्ये : संदीप शेळके
आजोबा दिवंगत स्वातंत्र्यसेनानी उत्तमराव पाटील यांच्यामुळे काँग्रेस पक्षाशी आपली नाळ जुळलेली असल्याचे सांगत, शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा वारसा जपण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे संदीप शेळके यांनी नमूद केले. पक्षाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींच्या सूचनांनुसार पक्षातील ज्येष्ठ, अनुभवी तसेच युवा कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक पुढाकार घेण्याची भूमिका त्यांनी मांडली.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे नेतृत्व प्रेरणादायी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे नेतृत्व प्रेरणादायी असल्याचे संदीप शेळके यांनी सांगितले. महात्मा गांधी यांच्या विचारांवर मार्गक्रमण करत त्यांनी पक्षाचा विचार जनमानसात रुजवला. कमी वयात जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, प्रदेशाध्यक्ष तसेच राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक पदे भूषवून त्यांनी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. जिल्ह्यात कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी करण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांचे पाठबळ नवी ऊर्जा देणारे असल्याचे शेळके यांनी सांगितले.

