-वन विभागाच्या दुर्लक्षाचा आरोप; आमदारांकडे तक्रार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा, सावंगी भगत व गोरेगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून अस्वलाचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या मजुरांमध्येही भीतीचे वातावरण असून महिला मजूर काम करण्यास टाळाटाळ करत आहेत.
साखरखेर्डा परिसरात आधीच रानडुक्कर, नीलगाय (रोही) आणि हरीण यांसारख्या जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस शेतात राखण करावी लागत आहे. या प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे बिबट्याचाही वावर वाढला असून मोहाडी शिवारात त्याचे वारंवार दर्शन होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. विशेष म्हणजे बिबट्याची दोन पिल्लेही परिसरात असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत आता अस्वलाचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. सावंगी भगत शिवारात गेल्या दोन दिवसांपासून अस्वलाचे वास्तव्य असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक व शेतकरी जीव मुठीत धरून शेतीकाम करत आहेत.
या संदर्भात काँग्रेसचे नेते सुधीर अप्पा बेंदाडे यांनी वन विभागाकडे तक्रार केली असता, अधिकाऱ्यांनी दखल घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मेहकर येथील वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करावा व जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

