-२०० रुग्णांची तपासणी; तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार व मार्गदर्शन
हिरडव वाजिद खान) : लोणार तालुक्यातील हिरडव येथे रामनवमीच्या औचित्य साधून श्री संत भगवान बाबा युवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. “गोरगरीब रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या भावनेतून आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष ॲड. शिवाजी सानप, खरेदी विक्री संस्थेचे संचालक विजय डोईफोडे, ग्रामसेवा सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव सांगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विठ्ठल घायाळ, विठ्ठल मुंडे, समाधान मोरे, हिम्मत कांबळे, उत्तम ईप्पर तसेच मुख्याध्यापक मदन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. डॉ. चांगाडे (मधुमेह व हृदय रोग तज्ञ), डॉ. डव्हळे (अस्थिरोग तज्ञ), डॉ. वैभव मुंडे (मूळव्याध व भगंदर तज्ञ), डॉ. कल्पना थोरवे (स्त्रीरोग व नाडी परीक्षण तज्ञ), डॉ. धनंजय नागरे आणि डॉ. वैभव जायभाये (जनरल फिजिशियन) यांनी आपली सेवा दिली. समता फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरामध्ये सुमारे २०० रुग्णांनी लाभ घेतला. मोफत तपासणी, रक्त तपासण्या आणि औषधोपचारामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. श्री संत भगवान बाबा युवा प्रतिष्ठानतर्फे सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जात असून, अशा उपक्रमांमुळे समाजातील वंचित घटकांना मोठी मदत होत असल्याचे मत ॲड. शिवाजी सानप व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

