-कीर्तन, अभिषेक, सांस्कृतिक सादरीकरणांनी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान (श्री राम मंदिर) येथे गुरुवारी (दि. २६) श्री रामजन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होत आहे. श्रींच्या वैभवी मंदिरात संगीत, नृत्य, गायन सेवा तसेच ज्ञानेश्वर महाराज कपलानेबुवा यांच्या हृदयस्पर्शी वाणीतून नारदीय कीर्तन सेवा सादर होत आहे.
श्री रामजन्मोत्सवानिमित्त संस्थानतर्फे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सुमारे २०० हून अधिक भाविक नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सकाळी वेद पाठशाळा आळंदी यांच्या मार्फत रुद्र अभिषेकाचे मंत्र पठण करण्यात आले, त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज कपलानेबुवा यांच्या कीर्तन सेवेने वातावरण भक्तिमय झाले. सोहळ्यात भरतनाट्यम सादरीकरण डॉ. परिमल फडके यांच्या परिमल परफॉर्मिंग आर्ट अँड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच विविध कलाकारांनी भक्तीगीत, अभंग, वाद्यसंगीत, भजन यांचे प्रभावी सादरीकरण केले. यामध्ये पंडित रमाकांत पराजपे, ज्ञानेश्वरी ताई रोकडे महाराज, रामकृष्णजी गरड महाराज, मुक्ता कुलकर्णी, सई देशपांडे, नितीन आवेकर, संजय भावे, अर्पणा केळकर, अमिता घुगरी, तुषार रिठे, हेमंत आठवले, अमित खरे, ज्योती गोराणे, श्यामजी गोऱ्हाणे, ह.भ.प. आबा महाराज गोडसे, विद्या इंगळे, रमा चोभे आदींचा सहभाग होता.
या सर्व कलाकारांचा आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे मुख्य विश्वस्त राहुल आवेकर, विश्वस्त अविनाश गुळुंजकर, अर्जुन मेदनकर, लक्ष्मीकांत दंडनाईक, चिन्मय चोभे, रमेश मुसुडगे व माजी विश्वस्त बिपीन चोभे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रामजन्मोत्सव दिनी मंदिरात नारदीय कीर्तन, पूजा, अभिषेक तसेच श्रींची पालखीतून नगरप्रदक्षिणा हरिनामाच्या गजरात काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त राहुल आवेकर यांनी दिली. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानतर्फे भाविकांना करण्यात आले आहे.