भगवानगडाचा ९२ वा नारळी सप्ताह; बडेवाडीत जय्यत तयारी

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान भक्तीमय सोहळा; कीर्तन-भागवत कथांची पर्वणी

बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : संत श्री भगवानबाबा यांच्या अखंड परंपरेतील ९२ वा नारळी सप्ताह यंदा पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा होणार आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.

सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी बडेवाडी येथे भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी भव्य मंडप उभारणीस प्रारंभ झाला असून ग्रामस्थांकडून जोमाने तयारी सुरू आहे. नारळी सप्ताहाचा प्रारंभ मंगळवार, दि. ३१ मार्च २०२६ रोजी होणार असून सांगता ७ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. सप्ताहादरम्यान श्रीमद् भागवत कथेसाठी प्रख्यात भागवताचार्य प्रकाश महाराज साठे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हरिकीर्तन कार्यक्रम:
▪️ ३१ मार्च – रामगीरी महाराज येळीकर
▪️ १ एप्रिल – तुकाराम महाराज शास्त्री मुंडे (परळीकर)
▪️ २ एप्रिल – ज्ञानेश्वर महाराज जळकीकर
▪️ ३ एप्रिल – निवृत्ती महाराज इंदोरीकर
▪️ ४ एप्रिल – प्रभाकर महाराज बोधले
▪️ ५ एप्रिल – प्रकाश महाराज साठे
▪️ ६ एप्रिल – महंत डॉ. नामदेव शास्त्री यांचे विशेष हरिकीर्तन
▪️ ७ एप्रिल – सकाळी काल्याचे कीर्तन व सांगता

अन्नदान व ज्ञानदानाची दिवाळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सप्ताहात सामूहिक अन्नदान, आध्यात्मिक मार्गदर्शन, निर्व्यसनीपणाचे प्रशिक्षण आणि संत विचारांचा प्रसार केला जातो. या परंपरेमुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांचे एकत्रीकरण घडते. भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य सेवा, वाहतूक व निवास व्यवस्था करण्यात येत असून देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बडेवाडी परिसरात सध्या भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

Share This Article
Exit mobile version